पुणे, २९ जुलै २०२०: पुणे शहरातील धायरी येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल महादेव बांदल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट मिळाली आहे.
“माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये” असं कोमलने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलं आहे. नुकतीच १२ वी ची परीक्षा दिल्यानंतर कोमलने नोकरीला सुरुवात केली होती, मात्र लॉकडाऊन पूर्वीच जॉब गेल्यामुळे कोमल तणावग्रस्त असल्याची माहिती आहे.
कोमलचे वडील आणि भाऊ एका खासगी कंपनीत नोकरी करतात. कोमलनं आत्महत्या करताना माझ्या मृत्यूस कुणालाच जबाबदार धरलं जाऊ नये, असं लिहिलं असल्यानं आत्महत्येबाबत संभ्रम अद्याप कायम आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
कोमलचं दरम्यानच्या काळात कुणाशी भांडण झालं होतं का? तसेच तीच्या वैयक्तिक आयुष्यात काही ताणतणाव होता का? या बाबींचाही पोलिस तपासात विचार केला जाणार आहे. अवघ्या 22 वर्षीय तरूणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश धावरे