गुजरात, ३० जानेवारी २०२३ : गुजरातच्या कच्छमध्ये सकाळी ६.२८ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (आयएसआर) नुसार, भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. त्याचे केंद्र कच्छमधील दुधई गावाच्या उत्तर-ईशान्येस ११ किलोमीटर अंतरावर होते. सोमवारी सकाळी झालेल्या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही, असे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गांधीनगरस्थित ‘आयएसआर’ने आपल्या वेबसाईटवर सांगितले, की भूकंप सकाळी ६.२८ वाजता झाला. ४.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. केंद्राच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी पहाटे ५.१८ वाजता भूकंप झाला होता. यावेळी भूकंपाची तीव्रता ३.२ नोंदविण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छमधील खवडा गावापासून २३ किमी पूर्व- आग्नेय दिशेला होता. काही मिनिटांच्या अंतराने झालेल्या या दोन भूकंपांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पहिल्या भूकंपाच्या वेळी लोक पळून घराबाहेर पडले.
‘आयएसआर’च्या अहवालानुसार, अहमदाबादपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाचा उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहे. तसे येथे नियमितपणे भूकंप होतात. तथापि, त्यांची तीव्रता कमी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती देखील नसते; मात्र बऱ्याच काळानंतर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे. सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्यात जानेवारी २००१ मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. ज्यामध्ये किमान १३,८०० लोक मारले गेले. १.६७ लाख इतर जखमी झाले. भूकंपामुळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांमध्ये मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड