कुर्डुवाडी (सोलापूर), दि. १३ जुलै २०२०: कुर्डुवाडीयेथील टेंभुर्णी रोडवरील ढवळसकर फर्मचे मालक प्रवीण ढवळसकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी चौघाजणांना सोलापुर गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तुल व दोन जिवंत काडतूसासह अटक करुन कुर्डुवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. आज या आरोपींना माढा येथील न्यायालयात उभे केले असता १८ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.२३ जून मंगळवार रोजी ढवळसकर फर्मचे प्रवीण ढवळसकर हे आपले दुकान बंद करुन आपल्या भावासमवेत मोटारसायकलवरुन घराकडे जात असताना रस्त्यामध्ये दबा धरून बसलेल्या अज्ञात तीन हल्लेखोरांनी ताटे-देशमुख हाॅस्पीटलसमोर त्यांची गाडी अडवून त्यांच्या हातातील खतावणीची पिशवी पैशाची पिशवी आहे असे समजून दोघांना मारहाण करुन फिर्यादी याचा भाऊ प्रवीण याच्यावर गोळी झाडून गंभीर जखमी केले. हातातील पिशवी हिसकावून घेत मोटारसायकलवरुन पळून गेले. याबाबत ढवळसकर यांच्या पिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत भादंवि कलम ३९७ शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणाबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक तयार करण्यात आले होते. कुर्डुवाडी येथे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींच्या मागावर असताना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ढवळसकर यांच्यावर हल्ला करणारे संशयित आरोपी मल्हारी उर्फ भैय्या विश्वनाथ लेंगरे वय ३२ रा. कुर्डुवाडी, पृथ्वीराज उर्फ गणेश वसंत गायकवाड वय ३२ रा.कुर्डू, सुरज ज्योतीराम भोसले वय ३० रा.कुर्डू, गणेश गोपीनाथ कापरे वय २९ रा.कुर्डू हे कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावरील टेंभुर्णी चौकातील साई हाॅटेलजवळ थांबले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने सदर ठिकाणी जाऊन गराडा घालून त्यांना पकडले.
त्यावेळी झडतीमध्ये सुरज भोसले याचेकडे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. तपासात गणेश गायकवाड याने सांगितले की काही महिन्यापूर्वी तो व भैय्या लेंगरे दोघे मिळून तुळशी येथील लेंगरच्या अोळखीच्या व्यक्तीकडे जाऊन त्यांना कुर्डुवाडी येथील व्यापाऱ्यावर गोळीबार करुन त्यांना लुटण्याचे काम दिले होते. परंतू त्यास तुळशी येथील व्यक्तीने नकार दिला. नंतर लेंगरे याने पींटू गुप्ते यास ढवळसकर यांना लुटण्याचे काम दिले. त्याप्रमाणे २३ तारखेला पींटू गुप्ते, सुरज भोसले व गणेश कापरे या तिघांनी ढवळसकर यांच्यावर फायरिंग करुन खतावणीची पिशवी चोरून नेली. सुरज भोसले याच्या ताब्यातून २० हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल ,६०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली २५ हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण ४५ हजार ६०० रुपयाचा मुद्देमालासह हस्तगत केला.
पुढील तपासासाठी या संशयित आरोपींना कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाळेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत, सहा पो.उपनिरीक्षक ख्वाजा मुखावर, गोरक्षनाथ गांगुर्डे, राजेश गायकवाड, नारायण गोलेकर, दिलीप राऊत, मोहन मनसावाले, पो.ना.बापू शिंदे, लालसिंग राठोड,रवी माने, पो.काँ. अजय वाघमारे, चालक केशव पवार या पथकाने केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील