मुंबई: महाराष्ट्र राज्यात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत ४७२ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४,६७६ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे २३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान या सोबत एक चांगली बातमी देखील आहे. देशामध्ये लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाता वेग कमी झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र आता यासाठी ७.५ दिवस लागत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लव अग्रवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये ८.५ दिवसांत कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होत आहे. तर, कर्नाटकमध्ये ९.२ दिवस, तेलंगणामध्ये ९.४ दिवस, आंध्र प्रदेशमध्ये १०.६ दिवस, जम्मू-काश्मीरमध्ये ११.५ दिवस, पंजाबमध्ये १३.१ दिवस, छत्तीसगडमध्ये १३.३ दिवस, तमिळनाडूमध्ये १४ दिवस आणि बिहारमध्ये १६.४ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट होत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ९ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्यासाठी ८ ते २० दिवस लागत आहेत. तर ७ राज्यांमध्ये २० ते ३० दिवस लागत आहेत. केरळ आणि ओडिशा ही दोन अशी राज्य आहेत ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी ३० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे.