जामखेड, १८ एप्रिल २०२३: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती सोहळ्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा सोहळा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे ३१ मे रोजी होणार आहे. आमदार राम शिंदे यांनी केलेली निधीची मागणी सरकारने मान्य केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार राम शिंदे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. नियोजन विभागाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समिती सचिव यांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
नियोजन विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गतच्या इतर जिल्हा योजनेतून एक वेळची विशेष बाब म्हणून ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. असं सांगण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर