रायगड, १२ जानेवारी २०२४ : ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ उलवे, नवी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यासाठी रायगड जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांच्या हजारो सदस्य महिला तसेच सीआरपी व नोडल अधिकारी उपस्थित राहणार होते. त्यांच्या प्रवासासाठी रायगड एसटी महामंडळासह एसटीच्या इतर विभागाच्या एकुण ६०४ एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रायगड विभागाच्या २०० तर इतर विभागाच्या ४०४ एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या.
राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षित असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महिलांना संघटित करणे, स्वावलंबी करणे, महिलांच्या संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनीधी एकत्र येऊन लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देणे हा या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उद्देश आहे. त्या उद्देशाला अनुसरून आज उलवे, नवी मुंबई येथे ‘नमो महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन’ करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातुन जाणाऱ्या महिलांसाठी रायगडसह राज्यातील इतर ठिकाणांहून ६०४ एसटी आरक्षित करण्यात आल्या होत्या.
रायगड जिल्ह्यातील आठ आगारातून २०० एसटी बसेस तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, मुंबई येथून ४०४ अशा एकुण ६०४ एसटी बसेस या कार्यक्रमासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासन असो अथवा केंद्र शासन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ नेहमीच अशा प्रकारच्या शासकीय मोठ-मोठ्या कार्यक्रमाला दळणवळणाच्या माध्यमातून उपयोगी पडतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – स्वप्नील पाटील