६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर…

नवी दिल्ली, २३ मार्च २०२१: ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठीच्या ज्युरींनी आज २०१९ या वर्षासाठीच्या विजेत्यांची घोषणा केली. याआधी अध्यक्ष आणि ज्युरी सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन विजेत्यांच्या नावाबाबत माहिती दिली. भारतीय सिने जगतातल्या दिग्गज चित्रपट निर्माते आणि मान्यवरांचा ज्युरींमध्ये समावेश होता. मध्यवर्ती पॅनेलचे अध्यक्ष एन चंद्रा, कथाबाह्य चित्रपट ज्युरी अध्यक्ष अरुण चढ्ढा, शाजी एन करूण, अध्यक्ष, सर्वाधिक चित्रपट स्नेही राज्य ज्युरी,सैबल चटर्जी, सर्वोत्कृष्ट लेखन सिनेमा ज्युरी यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

कथाबाह्य चित्रपटामध्ये ॲन इंजिनियर्ड ड्रीम हा हिंदी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा मान मरैकार–अरबीक्कडलिंदे– सिम्हम चित्रपटाने पटकावला.सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार कस्तुरी तर सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती चित्रपट म्हणून श्रीक्षेत्र –रु- साहिजता चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला.छिचोरे हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे

सिक्कीम सर्वाधिक चित्रपट स्नेही राज्य ठरले. बार्डो या मराठी चित्रपटातल्या रान पेटले या गाण्यासाठी सावनी रवींद्र यांची उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून निवड झाली. जलीकट्टू या मल्याळम चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफीसाठीचा पुरस्कार गिरीश गंगाधरन यांना जाहीर झाला आहे.

विजेत्यांची नावे –

६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९
सर्वाधिक चित्रपट स्नेही राज्यासाठीचे रजत कमल आणि प्रशस्तीपत्र सिक्कीमला जाहीर झाले आहे.

अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

मनोज बाजपेयी आणि धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. ५० हजार रुपये आणि रजत कमळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

५० हजार रुपये आणि रजत कमळ या स्वरूपाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी आणि पंगा या हिंदी चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी कंगना रानौतला जाहीर झाला आहे.

सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान आनंदी गोपाळ या मराठी चित्रपटाला प्राप्त झाला असून रजत कमळ आणि १,५०,००० रुपये असे याचे स्वरूप आहे. निर्माते एसेल व्हिजन,फ्रेश लाईम फिल्म्स,नमः पिक्चर्स आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांसयांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मतेवरची सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म हा मान ताजमल या मराठी चित्रपटाने पटकावला आहे. रजत कमळ आणि १,५०,००० रुपये असे याचे स्वरूप आहे.

कथाबाह्य चित्रपट विभागात उत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण पुरस्कार खिसा या मराठी चित्रपटासाठी, पी पी सिने प्रोडक्शन आणि दिगदर्शक राज मोरे यांना जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि ७५,००० रुपये असा हा पुरस्कार आहे.

उत्कृष्ट तपास चित्रपट म्हणून जक्कल या मराठी चित्रपटाने मान पटकावला आहे. निर्माते निओन रीळ क्रिएशनला आणि दिग्दर्शक विवेक वाघ यांना जाहीर झाला आहे रजत कमळ आणि ५०,००० रुपये असे याचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून मरैकार–अरबीक्कडलिंदे – सिम्हमने मान प्राप्त केला आहे. निर्माते आशीर्वाद सिनेमा आणि दिग्दर्शक प्रिय दर्शन सुवर्ण कमळ आणि २,५०,००० रुपयंचे मानकरी ठरले आहेत.

सर्वोत्कृष्ट ऑडीओग्राफी साठी त्रिज्या या मराठी चित्रपटासह इवधू आणि ओथा सेरुप्पू साईझ या चित्रपटानी बाजी मारली आहे.

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईनसाठी आनंदी गोपाळ चित्रपटासाठी सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांची निवड झाली आहे.

बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. रितू फिल्म्स याचे निर्माते असून दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. रजत कमळ आणि एक लाख रुपये असे याचे स्वरूप आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा