पुणे, २६ एप्रिल २०२०: सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा येथे मालवाहू ट्रकचालकाने दुचाकीचालकाला वाचविले. मात्र, त्याचवेळी काचेवर सूर्यकिरण चमकल्यामुळे ट्रक बॅरिगेट्सवर गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून जागीच ट्रक थांबविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने धाव घेऊन ट्रकचालकाच्या मदतीने ट्रकमध्ये अडकलेले बॅरिगेट काढले. ही घटना शनिवारी ( ता.२५ एप्रिल ) रोजी सायंकाळी ७:०० च्या सुमारास घडली.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर म्हेत्रे, महेश जगताप, दिनेश टपके, संतोष आढाव, शरद रसाळ, श्रीकांत काटकर, नितीन मुंडे, प्रशांत टोणपे, अमित कांबळे यांच्या पथकाने ट्रकमध्ये अडकलेली बॅरिगेट काढून वाहतुकीचा अडथळा दूर केला.
कोळी म्हणाले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने स्वतःच काही बंधने घालून घेणे आवश्यक आहे, प्रत्येकाने कामाशिवाय घराबाहेर पडू नये, निरोगी आणि सुरक्षित राहणे सर्वांच्या हिताचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, म्हणाले की, मागिल महिनाभरापासून देशभर लॉकडाऊन असून, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. मात्र, नागरिक घराबाहेर पडण्यासाठी निमित्त शोधत आहेत. घराबाहेर पडणे सर्वांनाच धोकादायक आहे. कोरोना व्हायरसवर मात करून लॉकडाऊन उठविण्यासाठी सर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कामाशिवाय घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे