बीड, दि.२८ एप्रिल २०२० : हातभट्टी दारूची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून एका कुटूंबाच्या दारासमोर लिंबू-मिर्चीसह अन्य साहित्य जाळून अंधश्रध्देतून संबंधित कुटुंबियाला बहिष्कृत केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनीजवळा येथे उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे हनुमंत भोसले यांच्याकडे संबंधित कुटुंबियांनी मदत मागितली आहे. या प्रकरणी भोसले हे स्वत: फिर्याद देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलिस यंत्रणेकडे करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील सोनीजवळा येथील भागवत बन्सी पवार यांचे कुटुंबीय सोनीजवळा येथील पारधी वस्तीवर राहतात. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी यूसुफ वडगाव पोलिसांनी या भागात अवैधरित्या हातभट्टी दारू उत्पादन करणार्या अड्ड्यांवर छापे मारून ते अड्डे उद्ध्वस्त केले होते. दारू बनवण्याचे साहित्यही नष्ट केले होते.
पोलिसांनी केलेली कारवाई ही भागवत बन्सी पवार यांच्या सांगण्यावरूनच केली असा संशय घेऊन येथील ताई भास्कर काळे व इतर पाच जणांनी भागवत व त्यांच्या कुटुंबियांवर डोळा ठेवत त्यांच्या घरासमोर जादूटोणा करून त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला आणि भागवत पवार यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकले. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत भागवत पवार यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे हनुमंत भोसले यांच्याकडे मदत मागितली आहे. आजच्या कोरोना परिस्थितीतही बीड जिल्ह्यात कुटुंबावर बहिष्काराच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी