पिंपरी चिंचवड, २९ एप्रिल २०२०: कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काल आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. सोमवारी राज्यात कोरोनाचे ५२२ नवीन रुग्ण आढळले होते तर काल हाच आकडा ७२९ वर पोहचला होता . कोरोना मृत्यूंचे प्रमाणही वाढले असून आज दिवसभरात ३१ जण या साथीने दगावले आहेत. अशातच अजून एक रुग्ण पिंपळे निळख येथे अाढळून आला आहे. या रुग्णावर औंध येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पिंपरीचिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहिती नुसार काल ( मंगळवार ता.२८ ) पिंपळे निलख परिसरातील एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सदर रुग्ण हे मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत होते. ते पिंपळे निलख येथे राहतात. २४ तारखेला मुंबईहून ते आपल्या घरी पिंपळे निलख येथे आले होते.
घरी आल्या नंतर दोन दिवसांनी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता. उपचारासाठी त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तपासणी केल्या नंतर काल रात्री ते पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्ण राहत असलेल्या भागातील एकूण दहा जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यातील तीन रुग्ण हायर रिस्क संपर्कातील असल्यामुळे तर इतर सात रुग्ण रिस्क संपर्कातील नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आले.
पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आजूबाजूच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याचा आदेश देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे