क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा कोरोनापेक्षाही भयानक – चित्रा वाघ

नवी मुंबई, दि.१८ जुलै २०२० : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पनवेल मधील क्वारंटाईन सेंटरची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे पनवेलमध्ये एकच खळबळ माजली असून या प्रकरणावरुन आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे.

‘महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचलाच कसा? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन यंत्रणा काय करत होती? महिलांसाठी असलेला दिशा कायदा ही केवळ घोषणाच होती का’?, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

‘पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा कोरोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या क्वारंटाईन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातच कसे? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते?,’ असे सवाल चित्रा वाघ यांनी केले आहेत.

या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण, त्यासोबत क्वांरटाईन सेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’ चं काय झालं? की ती फक्त घोषणाच होती,’ अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा