पुणे, ३१ जुलै २०२० : पुणे महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना पुणेकरांच्या मदतीच्या हाताने शंभर हत्तींचे बळ येते व सर्वांच्या सहकार्याने ही लढाई जिंकण्याचा विश्वास बळावतो, असे उदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.
यशराज शेट्टी मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांसाठी १०० पीपीई किट भेट देण्यात आले. त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ पाटील,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,अविनाश लांजेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. माझ्या शहरातील नागरिकांना कोरोना पासून वाचविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यभावनेतून पी पी ई किटची मदत करून आपला खारीचा वाटा उचलावा या भावनेतूनच मदत कार्य सुरु असल्याचे हॉटेल व्यावसायिक व पुणे बंट्स संघाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष यशराज शेट्टी म्हणाले.
कोरोनाच्या काळात युवकांनी केलेले कार्य स्पृहणीय असून सतत युवा पिढीवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी