पुण्यातील महिला डॉक्टरच्या पत्राची थेट PMO ने घेतली दखल

पुणे, ४ ऑगस्ट २०२० : पुण्यातील डॉ. अर्चना गोगटे यांना पंतप्रधान कार्यालय (PMO) कडून मिळालेला प्रदिसाद हा त्यांच्यासाठी अनपेक्षित, आनंददायी आणि अविस्मरणीय होता. डॉ. अर्चना यांनी आपली अडचण पत्राद्वारे पंतप्रधान कार्यालयाला लिहिली होती आणि नंतर त्या स्वतःच या पत्राबद्दल विसरून गेल्या. मात्र आता असं काही घडलं ज्यामुळे त्यांनी आपलं मत योग्य ठिकाणी दिली असल्याची त्यांच्यात भावना निर्माण झाली.

नेमकं काय प्रकरण आहे?

पुण्यात राहणाऱ्या डॉ. अर्चना गोगटे यांचं फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी स्वतःचं क्लिनिक होतं. मात्र ज्या इमारतीत त्यांचं क्लिनिक होतं त्याजवळच एक वाईन शॉप आणि बार होते. वाईन विक्रेता हा ग्राहकांना मद्याची बाटली, ग्लास वैगेरे विकत होता. आणि हे मद्यपी इमारतीच्या पायऱ्यांवरच आपल्या दारूच्या पार्ट्या करत होते. या तळीरामांमुळे डॉ. अर्चना यांना असुरक्षित वाटत होतं त्यामुळे त्यांनी याची तक्रार वाईन विक्रेता आणि बार मालकाकडे केली ज्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर नाईलाजानं त्यांना २००९ साली आपलं क्लिनिक दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करावं लागलं.

२००९ साली त्यांनी आपलं क्लिनिक दुसऱ्या ठिकाणी हलवलं.पण वाईन शॉपमधुन दारू विकत घेऊन क्लिनिक जवळच्या पायऱ्यांवरच पार्ट्या करणाऱ्या त्या तळीरामांमुळे आणि बारमध्ये येणाऱ्या काही विचित्र लोकांच्या भीतीने डॉ. अर्चना यांचं क्लिनिक कुणीही विकत घ्यायला तर झाले नाही किंवा भाडे तत्वावर देखील घेतले नाही. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी डॉ. अर्चना यांनी त्याठिकाणी २०१९ मध्ये वैद्यकीय लॅब चालू केली. मात्र त्यांना पुन्हा तीच समस्या जाणवू लागली. यावेळी त्यांनी वाईन शॉप आणि बार यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाची पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी ”हा पुणे महानगरपालिकेचा प्रश्न आहे” असं म्हणत हात वर केले. डॉ. अर्चना यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ”हा सामाजिक प्रश्न आहे” असं सांगत त्यांनीही यातून काढता पाय घेतला. डॉ. अर्चना यांच्या क्लिनिकजवळ तळीरामांच्या दारू पार्ट्यांमुळे अस्वच्छता पसरत असल्याने डॉ. अर्चना यांनी अनेकदा  स्वखर्चाने त्या परिसराची स्वच्छता करवून घेतली. मात्र अद्यापही त्यांचा प्रश्न काही सुटला नव्हता.

एके दिवशी अशाच नेहमीच्या त्रासामुळे त्या खूप तणावात असताना त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलं. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं हात वर केल्याने त्यांनी नाइलाजात्सव हे पत्र लिहीत आपली समस्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मांडली होती. मात्र कालांतराने त्या स्वतःच  या पत्राबद्दल विसरून गेल्या होत्या, आणि त्यांचं दैनंदिन आयुष्य सुरु होतं.

काही दिवसांपूर्वी डॉ. अर्चना यांना पोलीस स्टेशनमधून फोन आला. पोलिसांनी डॉ. अर्चना यांना सांगितलं कि आम्ही वाईन शॉपच्या मालकाला आणि बार मालकाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं आहे. डॉ. अर्चना म्हणाल्या कि, मी तर कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. तेव्हा पोलिसांनी डॉ. अर्चना यांना सांगितलं कि, ” तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं होत. तुम्हाला वाईनशॉप आणि बार यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हला थेट पंतप्रधान  कार्यालयातून आदेश आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला याबाबत लवकरात लवकर चौकशी करून गरज पडल्यास वाईनशॉप आणि बार यांचे लायसेन्स रद्द करण्यास सांगितले आहे.”

डॉ. अर्चना यांना आपल्या पत्राबद्दल विसर पडला होता. मात्र पोलिसांशी झालेल्या संवादानंतर त्यांना सर्व प्रकार लक्षात आला. त्यांच्या तक्रारीची दखल थेट पंतप्रधानांनी घेतल्याने त्या भारावून गेल्या. या सर्व प्रकाराबद्द्दल त्या म्हणतात – ”मला असं मुळीच वाटलं नाही कि, कोरोनाच्या महामारीच्या काळात नागरिकांच्या समस्या पाहणे आणि त्या सोडवणे ही कामे होत असतील. मला आनंद आहे कि मी माझं मत वाया घालवलं नाही. मला आशा आहे कि नागरिक आपल्या देशासाठी चांगली मेहनत करतील.” – डॉ. अर्चना गोगटे, पुणे

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा