पुणे, दि. ६ ऑगस्ट २०२० “के.के.मोहम्मद”म्हणजेच करिंगमन्नू मोहम्मद केरळ मधील कलिकत मध्ये राहणारा एक छोटा मुलगा. बियरन कुट्टी हाजी और मारीयाम् यांच्या पाच मुलांमधील हा दुसरा मुलगा. लहानपणापासूनच भरपूर पुस्तक वाचणारा,मोठे होण्याची स्वप्ने उराशी बाळगणारा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक वाचल्यानंतर त्याला इतिहासात खूप रुची निर्माण झाली. त्यासाठी त्याने चक्क १२ वी नंतर आपले घर सोडले व अलीगढ गाठले. तिथे तो इतिहासाच्या शिक्षणात चांगलाच रमला. तसा तो त्याविषयातील जाणकार व हुशार मुलगा होता. तज्ञ प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपली P.hd.करायची होती. डाव्या विचारांचे ते विद्वान मात्र फक्त आपल्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करत. त्याच्या पेक्षा कमी गुणवत्ता व गुण असणाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी निवडले परंतु या बुद्धिमान मुलाला मात्र केवळ आपल्या विचारसरणीचा नाही म्हणून वगळले. समाजातील भेदांचा व राजकारणाचा अनुभव अगदीच तरुणपणात त्याला आला. त्यातून तो अधिकच कणखर बनला.
१९७७ साली त्याने स्कुल ऑफ़ पुरातत्व सर्वेक्षण, पुरातात्विक सर्वेक्षण भारत, नई दिल्ली येथून पदविका अभ्यास पूर्ण केला. त्याचा यापुढील प्रवास खूपच खडतर तर होताच पण आव्हानात्मक होता. भारतभूमी ही अनेक मंदिरांची भूमी. एक उज्ज्वल व प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेली ही पुण्यभूमी परकियांच्या अनेक आक्रमणात येथील वारसा जमीनदोस्त केला गेला. नालंदा व तक्षशीला सारखी विद्यापीठे जाळून टाकण्यात आली.काही मंदिरं जमीनदोस्त केली गेली. निसर्गाच्या रौद्ररूपामुळे काही ऐतिहासिक वारसे जमिनीच्याखाली गाडली गेली. यासर्वांचा अभ्यास करताना के. के. मोहम्मदचे हृदय अस्वस्थ होत असे. त्यातून निर्माण झाली जिज्ञासा.आपल्या पौराणिक वारसा शोधण्याची प्रचंड उर्मी..कित्येक तास पायी चालणे..आग ओकणाऱ्या हिरण्मयाशी त्याचे मैत्र जुळले.सर्व ऋतुंच्या सोबत तो अनेक आव्हानांना सामोरे जात होता. संस्कृत सारख्या अतिशय अवघड भाषेचा तो जाणकार झाला. पुरातात्विक वास्तुशास्त्राचा तो स्थापती झाला. त्याने आपल्या बुद्धिमत्तेला अमुर्तातून मूर्ती सापडण्याच्या कौशल्यात चांगलेच सजवले. पाहता पाहता त्याने ८० मंदिरांचे उत्खनन करून त्यांना संरक्षित केले.
चंबळ खोऱ्याचे नाव त्यावेळी सर्वत्र गाजत होते. अनेक डाकूंच्या टोळ्यांच्या दहशतीचने हा परिसर ग्रासून गेलेला होता. के. के. मोहम्मदांना अभ्यासांती लक्षात आले होते की या भागात अनेक मंदिर असणार. त्यांचे उत्खलन केले तर मोठा सांस्कृतिक वारसा जगाच्या समोर येईल. त्यांनी निर्भयतेने चक्क डाकू निर्भयसिंग गुर्जर या कुप्रसिद्ध डाकूला सामोरे जात त्याच्याशी मैत्री करत बटेश्वर मंदिर व त्यासोबतच जवळपास २०० मंदिरांचे पुनर्निर्माण केले.
त्याच बरोबर जेंव्हा पाकिस्तान चे परवेज मुशरर्फ व अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे भारत दौ-यावर आले होते तेंव्हा ते त्यांनी या दोघांचे टूर गाईड म्हणून देखील काम पाहिले होते.
पुढे ते भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक झाले. मानाच्या पदमश्री पुरस्काराने ते सन्मानित झाले. त्याही पेक्षा त्यांचे योगदान सगळ्यात मोठे आहे ते अयोध्येत श्रीराम मंदिर उभा राहण्याच्या प्रक्रियेत…
मोहम्मद यांनी १९७८ मध्येच अयोध्येत झालेल्या उत्खननाच्या कामात प्रशिक्षणार्थी पुरातत्व अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. अयोध्येत १९७८ च्या काळात केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले होते. मात्र, ते सत्य समोर आणले गेले नव्हते. १९९० च्या काळात काही डाव्या इतिहासकारांनी जाणून बुजून अयोध्येत पुरातत्व विभागाला उत्खननात मंदिराचे कोणतेच पुरावे मिळाले नाही, असे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण वादाचे कारण बनले.के. के. मोहम्मदसारख्या सच्या अधिकाऱ्याला समोर येऊन तिथे मंदिर असल्याचे पुरावे असल्याचे म्हणावे लागले. त्यांना उत्खलनात तर १२ स्तंभ मिळाले होते. नंतरच्या काळात न्यायालयाच्या निर्देशानुसार झालेल्या उत्खननात ५० पेक्षा जास्त स्तंभ आणि विवादित जागी मोठे राम मंदिर असल्याचे शिलालेखही मिळाले. अनेक मुस्लिम आधीच या वादग्रस्त स्थळावर दावा सोडून ते हिंदूंना देऊ इच्छित होते. मात्र डाव्या विचारसरणीच्या अनेक इतिहासकारांनी आणि बुद्धिवंतांनी लोकांना भ्रमित करत वाद कायम ठेवले. पुरातत्व विभागाच्या रिपोर्टच्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेत श्रीरामाचे मंदिर असल्याचा निकाल दिला.त्यासर्वात के. के. मोहम्मद यांचे मोठे योगदान होते.
आपल्या सोबत काम करणाऱ्या कारागीरांच्या मुलांच्यासाठी त्यांच्या पत्नीच्या मदतीने त्यांनी शाळा सुरु केल्या. भारतातील हिंदू,बौद्ध,जैन, मुस्लिम धर्माचा वारसा असणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे उत्खलन करून सुरक्षित केल्या. ‘मैं एक भारतीय’ हे त्यांचे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे.
मोहम्मद गजनी,मोहम्मद घोरी सारख्या हल्लेखोरांनी अनेक मंदिर तोडली. परंतू भारताचा वारसा जगणाऱ्या के. के मोहम्मद यांनी मात्र आपले वेगळेच उदाहरण कायम करत शेकडो मंदिरांचे पुनर्निर्माण केले.
अशा या राष्ट्रभक्त पुरातत्व संशोधकाला शत शत प्रणाम…👏
माहिती संकलन : सोशल मिडिया
संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी