तिचा मुलगा व ती पेढ्याचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आ घले. मी कमरेला टॉवेल गुंडाळून हॉलमध्येच चटईवर पडून पडून टीव्हीवर चित्रपटशा बघत होतो. चित्रपटाचे नाव होते “हम दिल दे चुके सनम”….. आणि ओट्यावर खुर्ची टाकून माझी बायको किशोर शांताबाई काळे लिखित “कोल्हाट्याचं पोर” हे पुस्तक वाचत बसली होती. ती दारात येताच माझी बायकोला आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला.आणि मला म्हणाली अहो ! ऐकता का, आपल्या बाजूच्या सुवर्णा मॅडम आपल्या कडे आल्या आहेत ! मला वाटलं माझी बायको माझी मस्करी करत असेल. पण त्या दोघीचा आवाज ऐकला आणि मी पटकन टॉवेल कमरेला गुंडाळून उठलो आणि मागच्या खोलीत पळत गेलो.माझ्या काळपट तोंडावर डव साबण लावून पाणी मारले व चालूच इस्त्री केलेली पॅंट घालून हाँलमध्ये आलो. तोपर्यंत माझ्या बायकोने तिला बसायला प्लास्टिकची खुर्ची दिली होती. अजुन मी घरात फर्निचर बनवले नव्हते. फक्त एक लोखंडी कपाट होते आणि त्यातही माझ्या वाचनाची पुस्तके ठेवलेली होती. खरं म्हणजे फर्निचर बनविण्यासाठी मी ग.स. बँकेतून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. पण विद्यमान संचालक मंडळाने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे प्रशासक बसला होता. आणि बँकेत ठणठणाट झाल्यामुळे माझं फर्निचर बनवायचं स्वप्न दुभंगलं होतं…..
ती आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली म्हणून त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून ती इकडे तिकडे माझ्या घरभर नजर फिरवीत होती. तिच्या बंगल्यात आणि माझ्या घरात मनातल्या मनात तुलना करत होती. तुलनेत तिने माझी किमत केल्याचं स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिने मला तिच्या हाताने माझ्या हातात केसरी पेढा ठेवला.व तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या हातात पेढा दिला. मावशीचे पाया पडुन घे राज्या ! तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या पायांना स्पर्श करीत आशिर्वाद घेतला. मग ती माझ्या बायकोबरोबर गप्पा करायला लागली. मी समोरच असलेली खाट घरात आणली व त्यावर बसत तिच्या मुलाला जवळ बसविले. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले….. आज दहावीचा निकाल होता ना ! आमच्या राजा बेटाने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. आणि ९७ टक्के गुण मिळवले. मी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि मनापासून अभिनंदन,कौतुक केले. तोच तिचा पुढचा प्रश्न ओठातून निघाला….. तुमचा मुलगा सुद्धा दहावीला होता ना ? मग त्याच्या निकालाचं काय झालं ? तो काही दिसत नाही घरात ? तिच्या या नाजूक प्रश्नामुळे माझ्या बायकोला थोडं अवघडल्यासारखं झालं. तीनं माझ्या कडे नजर टाकत आपल्या मानेला चोळत चोळत म्हणाली हो हो तो पण गेला आहे निकाल घ्यायला….. येईलच एवढ्यात ! माझ्या बायकोनं तिच्यासाठी दुधात पाणी न टाकता चहा ठेवला….. तितक्यात माझं कारटं त्याच्या मित्रांसोबत जोरजोरात गप्पा हाणत घरात घुसलं…..आणि थेट किचन रुममध्ये गेलं ! माठावरचा ग्लास माठात बुचकवून घटा घटा दोन ग्लास पाणी प्याला. त्याचे मित्र माझ्या खाटेजवळ उभे राहिले. ती अतिशय बारकाईने त्यांचं निरीक्षण करत होती. माझ्या कारट्याच्या चेहरा घामाने डबडबलेला होता.तो घामाळलेला चेहरा त्याच्या आईच्या गळ्यात असलेल्या ओढणीला त्याने पुसला….. माझं कारटं तिच्या मुलाच्या पाठीवर थाप देत म्हणालं अभिनंदन दोस्ता….. जिल्ह्यात पहिला आलास…..I proud of you. मी त्याच्या इंग्रजी बोलण्याकडे बघतच राहिलो. माझा कारटा तिच्या पायांना स्पर्श करत म्हणाला आई ! मला आशीर्वाद द्या पुढच्या शिक्षणासाठी ! तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ प्रश्न केला….. किती टक्के गुण मिळाले रे तुला ?
माझं कारटं हसतच म्हणालं…..माझ्या बाबांपेक्षा जास्त ! माझ्या बाबांना दहावीला ६४% टक्के गुण होते. आणि मला ८९% टक्के गुण मिळाले. आणि राक्षसा सारखा हसला….. हा हा हा…..ती व तीचा राजा बेटा माझ्या कारट्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद न्याहाळत होते. त्याचे मित्रही लैच खूष दिसत होते. त्याच्या मित्रांपैकी एकाला ७१, दुसऱ्याला ६५ आणि तिसऱ्याला ८० टक्के गुण मिळाले होते.माझ्या मुलाने लगेचच त्याच्या आईकडून शंभर रुपये मागितले….. त्याच्या मित्रांना पाणी पुरीची पार्टी देणार होता तो ! तो सुद्धा त्याच्या सरकारी शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. तिने माझ्या मुलाला प्रश्न केला….. पुढे काय करणार आहेस ? माझा मुलगा हसतच म्हणाला मँकेनिक डिप्लोमा करणार त्यानंतर कम्प्युटर मध्ये बी.ई.करणार आणि बी.ई.झाल्यावर माझ्या बापाची शेती करणार ! एवढं बोलून तो लगेचच घराबाहेर पडला.आणि मित्रांसोबत सायकल घेऊन पाणीपुरी खायला निघून गेला. तेवढ्या वेळात माझ्या बायकोने एकदम स्पेशल चहा केला होता. खास तिच्यासाठी !…..
मी तिच्या बाळाला प्रश्न केला तू काय करणार आहेस बेटा पूढे ? तो म्हणाला मम्मी पप्पा सांगतील तेच मी करणार आहे. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर आले. त्याला बारावी करायची आहे.बारावी नंतर हैदराबाद किंवा दिल्ली येथे आयटी साठी पाठवायचे आहे. आणि जेईई च्या परीक्षेच्या तयारी साठी त्याला राजस्थान येथील कोट्टा येथे क्लासेस लावायचे आहेत.कोटाच्या क्लासमुळे त्याला बारावीला ९९%टक्के गुण मिळतीलच अशी आम्हाला खात्री आहे. मी तिच्या बोलण्याकडे टक लावून लक्ष देत होतो. तिचा मुलगा तिच्यासारखाच कोमल आणि नाजूक होता. त्यातल्या त्यात अतिशय सोज्वळ होता. थोड्याच दिवसात तिचा मुलगा कोटाकडे निघाला. त्याला पोहचविण्यासाठी ती, तिची छकुली,तिचा भाऊ व तिचे पतीदेव सारेच जण गेलेत स्वतःच्या फोर व्हीलर ने गेले. दोन लाख रूपये क्लासेसची फी,खाण्याचे व रहायचे वेगळे असे करून वर्षाला चार पाच लाखाचा खर्च म्हणाली होती ती ! माझं कारटही निघालं होतं नाशिकच्या गव्हर्नमेंट पाँलिटेक्निक कालेजात मँकेनिक डिप्लोमा शिकायला …..हळूहळू एक वर्ष पूर्ण झालं.माझं कारटं पहिलं वर्ष डिप्लोमा पास झालं.त्याची आई अधूनमधून नाशिकला त्याला भेटायला जायची. माझ्या कारट्याची मावशी नाशिकच्या आंबेडकर नगरमध्ये रहायची ती नेहमीच त्याचे पालक म्हणून कालेजात भेट द्यायची. मी मात्र एकदाच गेलो त्याला भेटायला. कारण माझं पूर्ण शिक्षण बोर्डिंग आणि वसतिगृहात झालं पण माझा बाप एकदाच मला भेटायला आला होता. माझ्या बापाचा बदला मी माझ्या कारट्या कडून घेत होतो.
मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत निश्चिंतं झालो होतो.पण तिची काळजी दिवसेंदिवस वाढतच होती. तिच्या मुलाचं बारावीचं वर्ष म्हणून ती मुलाला सारखा फोन करायची.महिन्यातून एकदा पतिदेवांसोबत कोट्याला जायची.त्याच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यायला सांगायची.आणि क्लासेसचं सांगाल तर तिच्या मुलाच्या चाचणी परीक्षेचे गुण तिला फोनवर मेसेज द्वारे कळत होते. तिचा मुलगा प्रत्येक विषयात ९५,९७,९८ गुण मिळवत होता. गणितात तर तो शंभर पैकी शंभर गुण मिळवत होता. ती रात्री गच्चीवर जाऊन त्याच्याशी फोनवरून बोलायची.मी माझ्या ओट्यावर बसून ऐकत रहायचो.ती म्हणायची तू अजून अभ्यास कर,मन लावून अभ्यास कर…..तुझ्यासाठी किती खर्च करीत आहोत आम्ही. प्रत्येक विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले पाहिजेत.आयटी साठी किती स्पर्धा आहे तुला माहिती आहे का? अठरा अठरा तास अभ्यास कर .तिच्या मुलाने तिच्या आज्ञेचं पालन करीत खूप अभ्यास केला.तिच्या मुलाला अभ्यास करून करून पाठीला वाक आला होता. माझं कारटं दुसऱ्या वर्षाला काँलेजला दांड्या मारायला लागलं होतं.प्राध्यापकांशी हुज्जत घालत होतं,प्रक्टीकल बुडवत होतं, विद्यार्थी संघटनेत सहभागी होत होतं.मित्रांसोबत कधी हाटेलात बिऱ्याणी खात होतं तर कधी सिगारेट फुकत होतं….. एकदा तर त्याच्या मित्रांशी पैज लावून दारु पिऊन चक्क मला फोन केला. म्हणतो कसा बाबा आज मी ड्रिंक घेतली आहे. आणि आय लव यू बाबा….. तूम इन्सान नही, इन्सान के रुप मे खूदा हो….. माझ्या कारट्याला त्याच्या आईने अँन्ड्राईड मोबाईल घेऊन दिला होता. त्याच्यावर स्टेट्स ठेवलं होतं…..जिंदगी का सफर युही कटता चला खुशीसे……मेरे हिसाबकी मुश्कीले भी मेरे वालिद उठाते रहे…..त्याचं स्टेटस वाचून आपण बाप आहोत याची जाणीव व्हायची. पण दारुच्या बाबतीत विचार यायचा सालं ज्या गोष्टीला मी कधी स्पर्श केला नाही ते माझा कारटा वयाच्या अठराव्या वर्षी करत आहे….. पण ह्रदयावर हात ठेवीत मी आल इज वेल आल इज वेल म्हणून स्वतःलाशांत केले.
बारावीच्या परीक्षा होऊन निकाल जाहीर झाला . तिच्या मुलाला ९५%टक्के गुण मिळाले. तिच्या घरात स्मशान शांतता होती. मी पेढ्याची वाट बघत होतो आणि तिचीही. या दोन वर्षात परत ती माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलली नव्हती. ती तिच्या मुलावर भयंकर रागावत होती. तिने त्या मुलाला धारेवर धरले होते. “तू आमचा अपेक्षा भंग केला आहेस, आणि असाच जेईई ला पण आमचा अपेक्षा भंग करशील. आम्ही केलेला एवढा खर्च वाया जाणार ,तू आम्हाला खाली मान घालायला लावणार, लोक आमच्यावर हसतील. नातेवाईक काय म्हणतील?दहावीला सत्त्याण्णव टक्के होते, बारावीला रिव्हर्स झाला. आम्ही काय तोंड दाखविणार “….. ती त्याला टार्चर करत होती. आणि तो सुन्नपणे तिच्याकडे बघत होता. त्याचा पप्पा ज्याच्या नावातच विनय होता तो एक शब्द त्याच्या बायकोला बोलला नाही….. ती रात्री जेवली नाही म्हणून घरात कुणीच जेवले नाही. एकमेकांना न बोलता जो तो ज्याचा त्याचा रुममध्ये गेले. ९७ चे ९५ झाले म्हणून तिच्या घरात दुखवटा झाला होता. तिचा मुलगा त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याचा बेडरूम म्हणजे अतिशय आकर्षक पीओपी केलेला. लाल, निळे, पिवळे,दूधी अशा प्रकाश देणाऱ्या विद्युत दिव्यांनी सजवलेली ती बेडरूम.
सकाळ झाली होती आज रविवार होता. सुटीचा दिवस असतांना सुद्धा कधी नव्हे एवढा आवाज तिच्या घरातून येत होता. माझी बायको मला म्हणाली….. अहो ! बघा तर,कशाचा आवाज होतोय तो ? मी तसाच टावेल कमरेला गुंडाळत पायात चपला न घालता तिच्या घराकडे पळालो.वीस वर्षांत पहिल्यांदा तिच्या घरात मी प्रवेश करत होतो. तिच्या पतीला आरडाओरड करण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली सकाळपासून माझ्या मुलाने दरवाजा उघडला नाही. आणि आम्ही आवाज देतो तर तिकडून काही एक प्रतिसाद येत नाहीये. मी त्यांना धीर दिला आणि दरवाजा तोडण्याची तयारी केली. तो दरवाजा अतिशय भक्कम होता. तिने तिच्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी पिवर सागाच्या लाकडाचा दरवाजा बनविला होता.आणि दरवाज्याला मेड इन जर्मनीचे लोखंडी कडी कोंडे बसविले होते त्यामुळे ते तुटता तुटत नव्हते. शेवटी आम्ही तीन चार जणांनी तीन तासाच्या प्रयत्नांनी तो दरवाजा तोडला. तिचा मुलगा त्या बेडरूममधील आरामदायी बेडवर निपचित पडला होता. तोंडातून फेस येत होता. त्याचा जीवनाचा प्रवास त्याने येथेच पूर्णविराम देऊन थांबविला होता. तिने त्या मुलाला बघताच टाहो फोडला आणि छाती ठोकू लागली. विनय सर नेहमीप्रमाणे मुकपटातल्या नायका सारखे भिंतीला पाट लावून बसले होते. त्या मानसशास्त्र शिकविणाऱ्या सरांनी आपली मान दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घातली होती आणि त्या महागड्या फ्लोरींगवर आपले कवडीमोल अश्रू गाळीत होते. बाजूलाच त्या मुलाचा स्टडी टेबल
होता .त्या स्टडी टेबलावर त्याच्या सुंदर अक्षरात त्याच्या मम्मीसाठी अखेरचा निरोप सोडला होता.
प्रिय मम्मी,
मला माफ कर मी तुझ्या नव्व्याण्णव ते शंभर टक्के पाडण्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण मम्मी हे गुण मला का पडले नाही तर मी मध्यरात्री पर्यंत विचार केल्यावर मला त्याचं कारण गवसलं…..कोट्याच्या या आख्ख्या दोन वर्षात मी एकेदिवशी मित्रांसोबत एक चित्रपट बघितला कदाचित त्यामुळे माझा एक मार्क कमी झाला असेल….. या दोन वर्षात मी एकदा मित्रांसोबत एन्जॉय म्हणून फिरायला गेलो होतो त्याचा एक मार्क कमी झाला असेल….. मम्मी, मी तुला कधीच सांगितलं नाही गं…..माझ्या क्लासमधील मुळची राजस्थानचीच असलेली ‘रुक्सार’ मला बघून एकदा हसली होती. त्यामुळे संपूर्ण एक रात्र तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून घालविली होती कदाचित त्याचा पण एक मार्क कमी झाला असेल….. एकदा किनी मम्मी मी हातगाडीवरची पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला होता. त्याची चव लैच झ्याक होती. आणि मी त्या दिवशी तुला फोनवर सांगितले पण तू फार रागावली होतीस. आणि म्हटली होतीस की,बाहेरचं खात नको जाऊ,पोट खराब होतं,अभ्यासावर परिणाम होईल! या विचारातच माझी रात्र गेली कदाचित त्याचाही एक मार्क कमी झाला असेल….. आणि मम्मी, मी एक दिवस ठरविलं होतं की, क्लासला दांडी मारून कोट्टा शहर बघावं म्हणून मी दांडी मारलीच आणि एकटाच आनंद घेत फिरलो. कदाचित त्यामुळे एक मार्क कमी झाला असेल…..मम्मी, तुझी शप्पथ घेऊन सांगतो गं ! हे पाच दिवस सोडले ना ,तर मी संपूर्ण दोन वर्षे फक्त आणि फक्त अभ्यासच केला आहे. मम्मी, अशी नाराज होऊ नकोस गं ! खरचं तू माझ्यावर खूप खर्च केलास त्याबद्दल तुझा आणि पप्पांचा आभारी आहे.
मम्मी, जाता जाता तुला एक गोष्ट सांगाविशी वाटते…..ते आपले बाजूचे काका आणि मावशी आहेत ना ! ते त्यांच्या मुलाला काहीच सांगत नाही गं,त्यांची त्यांच्या मुलांकडून मोठी अपेक्षाही नाही. हां ते त्यांच्या मुलांवर खूप रागावतात ,कारण तो रात्र रात्र जागरण करुन पबजी खेळतो,दिवसभर झोपतो. परंतु मम्मी त्याला थोडेसे जरी यश मिळाले तरी त्यांचं कुटुंब त्याचा यशाचा किती एन्जॉय करतात गं ? मम्मी त्यांच्या मुलांवर त्यांचं रागावणं म्हणजे ते मुलांची काळजी करणारं असतं…..त्या रागावण्यात कुठल्याच अपेक्षा नसतात, कुठलाही हिशोब नसतो,त्यांना खाली मान घालायची भिती नसते, कोण काय म्हणेल याच्याशी त्यांचं देणघेणं नसतं, नावं ठेवणाऱ्यांचा उद्देश ते तपासून बघतात.
माझी प्रिय प्रिय मम्मा,
तू त्या शेजारच्या काकांची फेसबुक फ्रेंड आहेस ना ! मी पण त्या काकांचे लिखाण तुझ्या अकाऊंटवर वाचत होतो. त्यांचं जीवन ते कसं स्पष्टपणे जगासमोर मांडतात. त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी कमीपणा वाटत नाही, भविष्यकाळा विषयी तर सांगायलाच नको. आणि वर्तमान तर तू त्यांच्याकडे कधी बघितलच नाहीस तर तुला कळेल कसं गं ?…..त्यांचं जीवन स्पष्ट आहे आणि आपलं काय आहे ते नेमकं कळत नाही ?….. आणि जे जीवन कळत नाही नां मम्मी ! त्याला जगून आणि भोगून काय उपयोग गं ?
मम्मी,
तुला आणि पप्पांना चांगला महिन्याला दीड दोन लाख पगार घरात येत असतांना सुद्धा तुम्हाला नीट झोप येत नव्हती.म्हणून डोक्याला शांतता मिळावी म्हणून तुम्ही झोपेच्या गोळ्या घ्यायचे.मम्मी, जसा मी शाळेत जायला लागलो तसं तू मला अभ्यास अभ्यास आणि अभ्यास कर असंच सांगत आलीस ! त्यामुळे माझं डोकं पुरतं अशांत झालं आहे. त्या डोक्याला शांत करण्यासाठी तुझ्या त्या डबीतल्या गोळ्या नाश्त्यासारख्या खाल्ल्या.आणि डोकं कायमचं शांतं केलं.
मम्मी,
मला जर भगवंताने पुढचा जन्म मानवाचा दिला तर मी सपशेल नकार देणार आहे. कारण मला माणसाच्या जन्मापेक्षा भुंगा व्हायला आवडेल ! फुलपाखरू व्हायला आवडेल ! मधमाशी व्हायला आवडेल,समुद्राच्या खोल खोल अतिशय खोल पाण्यात पोहणारा मासा व्हायला आवडेल! कारण हे कमी कालावधीच्या आयुष्यात खूप सारा आनंद उपभोगतात.मलाही तसचं स्वच्छंदी, निर्विकार, जीवन जगायचं आहे. पुढच्या जन्माण अपेक्षापुर्तीचं ओझं वाहणारं जीवन कधी, कधी, कधीच नको आहे. बस थांबतो…… कायमचाच……
तुझाच
आयुष
मी ह्या भावनांनी भरलेलं पत्र वाचून विनय पाटलाच्या हातात दिलं. आणि त्यांच्या बंगल्यावर खकारुन थुंकलो…..जिची कांती बघून माझी शांती भंग व्हायची आज ती मला अतिशय कुरूप आणि विद्रूप भासत होती. तिच्याकडे बघायची माझी अजिबात इच्छा नव्हती परंतु आज मी अखेरचे तिच्याकडे घृणास्पद नजरेने क्षणभर बघितले आणि दिर्घश्वास घेऊन तिला बोललो…..साले ,तुम्ही कशाचे आईवडील रे ! तुम्ही तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहात ! जे अपेक्षा पुर्तीसाठी अनेक रूपात, अनेक बंगल्यात, स्वत:चेच मुलांचे एन्काऊंटर करतात….. आणि माझ्या कानात एकच आवाज भणभणायला लागला….. एन्काऊंटर….. एन्काऊंटर….. एन्काऊंटर…..