उल्हासनगर, २६ ऑगस्ट २०२०: उल्हासनगरमध्ये डंपिंग ग्राउंडमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे उल्हासनगरमधील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी कॅम्प नं-५ खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी आमदार बालाजी किणीकर यांनी राज्याचे सचिव संजीव कुमार यांची भेट घेतली आणि यांबद्दल निवेदन दिल आहे .
डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधी व उन्हाळ्यात लागलेल्या आगीमुळे हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. सततची तक्रार करून सुद्धा महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही मात्र सतत डंपिंग ग्राउंडला विरोध केल्याने तसेच मोर्चा, आंदोलन, कचऱ्याच्या गाड्या अडविल्याने जागा मिळाल्यानंतर डंपिंग हटवणार असे त्यावेळी महापालिकेने सांगितले होते. महापालिका तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी राज्य शासनाकडे डंपिंग ग्राउंडसाठी पाठपुरावा केल्यानंतर उसाटणे गावा जवळील एमएमआरडीएच्या ताब्यातील जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी देण्याला तात्विक मंजुरी दिली. मात्र अद्याप पर्यंत जागा महापालिकेकडे स्वाधिन केलेली नाही.
उल्हासनगर कॅम्प नं. ५ मधील गायकवाड पाडा, सेक्शन ३६, प्रेमनगर टेकडी इत्यादी परिसरातील हजारो नागरिक या डंपिंग ग्राउंडमुळे त्रस्त झाले आहेत .या दुर्गंधीतुन स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे रोगाला आमंत्रण दिल्यासारखे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ३ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याचा लेखी इशारा देखील स्थानिक भाजपा नगरसेवकांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे