इंदापूर, दि. ३० ऑगस्ट २०२०: इंदापूर शहरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळ व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे कि, इंदापूर शहरामध्ये सध्या कोरानाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी इंदापूर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले की, कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावरती-देशावरती आलेले आहे. इंदापूर शहरातही महामारीची मोठी लाट आल्याचे जाणवत आहे. याची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे आहे. आपण संकटमोचक गणरायाचे गणेशभक्त आहोत. यामुळे आलेले हे संकट परतवून लावण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे वाटते.
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलींडर, प्रेशर कुकर, रबरी नळी इ. साहित्याचा सुरक्षिततेचे निकष वापरून नागरिकांना वाफ देण्याची सोय सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी लागणारा खर्च आपल्या मंडळाने ५० टक्के करावा. मी स्वतः ५० टक्के खर्च देण्यास तयार आहे.
याची त्वरीत अंमलबजावणी करण्याची गरज असल्याने सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाची सुरुवात करावी, व ज्या ज्या ठिकाणी उपक्रम सुरू करीत आहात तेथील जबाबदार कार्यकत्यांची यादी व खर्चाचा तपशील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष अनिल राऊत यांचेकडे देण्याचे आवाहन यावेळी प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे