ढाका, ५ सप्टेंबर २०२०: बांग्लादेशची राजधानी ढाका येथे एका मशिदीत सहा एअर कंडिशनर्सचा स्फोट झाला आहे. या स्फोटांमध्ये एक चिमुरड्यासह १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास नारायणगंज नदी बंदर शहरातील मशिदीत हा स्फोट झाला. शनिवारी उपचारादरम्यान ११ उपासकांचा मृत्यू झाला, तर शुक्रवारी एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, असे डॉ. सामन्था लाल यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आता इतर २५ जणांवर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत, परंतु त्यांची प्रकृती “अत्यंत नाजूक” आहे. कारण या स्फोटांमध्ये त्यांचे शरीर ९० टक्के भाजले गेले आहे. अग्निशामक अधिका-यांना संशय आहे की गळती झालेल्या पाईप लाईनमधून गॅस जमा झाला आणि त्यामुळे एसीचा स्फोट झाला.
“मशिदीच्या खाली टायटस गॅसची एक पाइपलाइन गेली आहे. पाईपलाईन मधून गॅस गळती झाली होती, सर्व खिडक्या बंद असल्यामुळे गॅस आत मधेच साठून राहिला. एखाद्याने एसी किंवा पंखे चालू किंवा बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्पार्कमुळे कदाचित स्फोट झाला होता.”
स्फोट होताच मशिदीतून पाच ते सहा जण बाहेर येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार मस्जिदमध्ये उपस्थित असलेले बहुतांश भाविक गंभीररित्या भाजलेले होते तर काही आतमध्येच पडलेले होते. पोलिस आणि अग्निशमन सेवा विभागांनी या घटनेचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे