अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, शिवसेनेचा सभागृहात आक्रमक पवित्रा

मुंबई, ८ सप्टेंबर २०२०: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सतत विवादात्मक टीका करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या त्यांनी ठाकरे सरकार आणि काही नेत्यांवर चांगलेच धारेवर धरलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उच्चार करण्यापासून ते संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापर्यंत सर्वच गोष्टीत ते चर्चेत राहिले आहेत. याविरोधात आता शिवसेनेनं पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे.

सध्या शिवसेनेचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशी याबाबत अधिवेशनामध्ये कोणतीही चर्चा झालेली दिसली नाही मात्र आज शेवटच्या दिवशी शिवसेनेनं यावरून गदारोळ घातला. यावेळी. शिवसेनेनं पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव येताच शिवसेनेचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले. अर्णब गोस्वामी हे सुपारीबाज पत्रकार आहेत, अशी तोफ शिवसेनेच्या आमदारांनी डागली.

“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

“अर्णब गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत” अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात असे घटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झालीच पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?” असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा