कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा भारतातील दर ७८% वर

नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२०: कोरोनातून रुग्ण लवकर बरे होण्याच्या प्रवासात भारतानं आज नवा टप्पा गाठलाय. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेख चढता असून हा दर ७८ % पर्यंत पोहोचला आहे. दररोज बरे होणाऱ्यांची वाढती संख्या यातून प्रतीत होत आहे.

गेल्या २४ तासात ७७,५१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं असून बरे झालेल्यांची एकूण संख्या आता ३७,८०,१०७ झालीय. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातलं अंतर सातत्यानं वाढत असून आज हे अंतर सुमारे २८ लाख (२७,९३,५०९) झालं आहे.

देशातल्या सक्रीय रुग्णांची सध्याची संख्या ९,८६,५९८ आहे. सक्रीय रुग्णांपैकी ६०% पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यात आहेत. एकूण बरे झालेल्यांपैकीही ६०% संख्या या पाच राज्यातली आहे.

 

देशात गेल्या २४ तासात ९२,०७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महाराष्ट्रातली संख्या जास्त असून गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २२,००० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. तर आंध्रप्रदेशात ९,८०० पेक्षा जास्त नवे रुग्ण नोंदवले गेलेत. एकूण रुग्णांपैकी सुमारे ६०% रुग्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यात आहेत.

गेल्या २४ तासात १,१३६ मृत्यू झाले असून त्यापैकी सुमारे ५३ % महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यातले आहेत. त्यानंतर तामिळनाडू, पंजाब आणि आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत. काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३६% पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात(४१६ मृत्यू) झालेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा