मुंबई, १९ सप्टेंबर २०२० : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कामकाजाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी यापुढे १००टक्के उपस्थित राहण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी प्रविणकुमार पवार यांनी आज दि.१८ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.
दि.६ जुलै रोजीच्या मार्गदर्शक सूचनांना आव्हान देणार्या तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य सरकार यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयास आव्हान देणार्या विविध रिट याचिका मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. सदर याचिकांमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.२८ ऑगस्ट रोजी राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या/ अंतिम सत्राच्या परीक्षा घ्यावयाच्या आहेत असा निर्णय दिला.
प्रचलित कार्यपध्दतीनुसार परीक्षा पध्दतीमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश असून त्यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे, अशी अनेक कामे समाविष्ट आहेत. सदर परीक्षा दि.१ ऑक्टोबर दि.३१ ऑक्टोबर या कालावधीत घेऊन त्याचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिर करणे. याकरिता मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एकंदरीत कमी कालावधीत परीक्षा पार पाडणे व त्याचा निकाल जाहिर करणे हे आव्हानात्मक काम प्राप्त परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठे/शैक्षणिक संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची यापुढे १००%उपस्थिती असणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये तसेच कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्य शासनाच्या तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या आदेशातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यासंदर्भात सर्व संबंधित विद्यापीठांनी/शैक्षणिक संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव