एकट्यांन सलग ३० वर्ष खोदून बनवला कालवा, आनंद महिंद्रांकडून ट्रॅक्टर भेट

बिहार, २० सप्टेंबर २०२०: बिहारमध्ये अशी एक व्यक्ती आहे जिनं ३० वर्ष सलग खोदून एक कालवा तयार केलाय. लौंगी भुईयां मांझी या ७० वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीनं आपल्या मेहनतीनं शेकडो लोकांच्या अडचणींवर विजय मिळविलाय. त्यांनी डोंगर फोडून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बनविला. डोंगर आणि पावसाचं पाणी कालव्यातून शेतात वाहत जात आहे. ज्यामुळं तीन गावातील नागरिकांना याचा फायदा होतोय. विशेष म्हणजे त्यांनी एकट्यानी हा डोंगर खोदून काढलाय. आता बरेच लोक लौंगी भुईयां यांच्या मदतीसाठी पुढं आले आहेत. त्यातीलच एक प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा ज्यांनी लौंगी भुईयां मांझी यांना ट्रॅक्टर देण्याची घोषणा केलीय.

सध्या गया जिल्ह्यात राहणार्‍या लौंगी भुईयां यांची कहाणी चर्चेत आहे. डोंगरावरुन पडणारं पावसाचं पाणी गोळा करण्यासाठी त्यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम केले आणि हे पाणी गावात आणण्याचं ठरविलं. ते रोज घरून जंगलात जायचे आणि कालवा बांधण्यास सुरवात करायचे. कोठिलवा गावाचे रहिवासी असलेले लौंगी भुईयां आपल्या मुलगा, सून व पत्नीसह राहतात. लौंगी भुईयां यांनी सांगितलं की सुरुवातीला कुटुंबातील लोकांनी त्यांना खूप विरोध केला. पण, त्यांनी ऐकलं नाही व कालवा खोदण्यास सुरवात केली.

त्यांनी कुदळ आणि इतर घरगुती साधनांद्वारे खोदण्यास सुरवात केली. ३० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ते सुमारे ३ किमी लांबीचा कालवा तयार करु शकले. अलीकडंच, नुकतंच एक ट्विटर वापरकर्ता रोहिन कुमार यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘लौंगी भुईयां यांनी आयुष्याची ३० वर्षे घालवून कालवा खोदला. त्यांना ट्रॅक्टरशिवाय इतर कोणत्याच गोष्टीची गरज नाही. त्यांनी मला सांगितलं आहे की जर त्यांना ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना मोठी मदत होईल.’

 

या ट्विटवर आनंद महिंद्रा यांनी उत्तर देताना लिहिलं की, ‘त्यांना ट्रॅक्टर देणं हे माझ सौभाग्य आहे. मी या आधी देखील ट्वीट केलं होतं की, मला वाटतं की त्यांनी खोदलेला हा कालवा ताजमहाल किंवा पिरॅमिड्ससारखाच प्रभावी आहे. त्यांना ट्रॅक्टर भेट करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’

लौंगी यांचे गावकरी सांगतात की त्यांना आजवर जेव्हा जेव्हा बघितलं ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसले आहेत. लौंगी भुईयां मांझी यांनी अलीकडंच म्हटलं होतं की जर सरकार काही मदत देऊ शकलं तर आम्हाला शेतीसाठी ट्रॅक्टर सारख्या सुविधा मिळू शकतील आणि शेतीसाठी आम्ही वांझ जमीन देखील सुपीक बनवू शकतो ज्यामुळं लोकांना खूप मदत होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा