नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. विरोधी पक्षातील खासदारांनी केलेल्या गदारोळाचा मुद्दा आज राज्यसभेत उपस्थित झाला. अध्यक्षांनी कमिटिंग खासदारांवर कारवाई केलीय. गोंधळ उडविणाऱ्या विरोधी पक्षातील ८ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, रिपुन बोरा, नजीर हुसेन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव, डोला सेन हे निलंबित केले जाणारे खासदार आहेत.
काल झालेल्या घटनेवर सभापती म्हणाले की, “राज्यसभेसाठी हा सर्वात वाईट दिवस होता. काही खासदारांनी कागदपत्रे फेकली. माईक तोडला, नियम पुस्तिका फाडण्यात आली या घटनेनं मला फार वाईट वाटलं. उपसभापतींना धमकी दिली गेली. त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या.”
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल झालेल्या घटनेवर सांगितलं की, “राज्यसभेत जे काही घडलं ते दुःखद, लाजिरवाणं आणि दुर्दैवी आहे.” विशेष म्हणजे काल राज्यसभेचं कामकाज मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं. शेती विषयक दोन विधेयकं पास झाल्यानंतर विरोधी पक्षांनी याचा जोरदार विरोध केला. शेतीविषयक विधेयकावरून विरोधी पक्ष सातत्यानं केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी यावरून आंदोलनं देखील करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे