विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गतवर्षीच्या ऊसाचे दर २५०० ठरवले – बबनदादा शिंदे

माढा, ११ ऑक्टोबर २०२०: माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात उस गाळपाचा राज्यात विक्रम स्थापन करण्याच्या तयारीत असून देशातील भरमसाठ होणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करता साखरेपेक्षा इथेनॉलच्या निर्मितीवर जादा भर देणार आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या ऊस बिलाच्या एफआरपी नुसार च्या रकमेचे राहीलेले २०० रुपये प्रति टन प्रमाणेचे बिल येत्या चार ते पाच दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी नुसार २४०० रुपये प्रति टन दर मिळणार आहेच. तसेच कारखाना एफआरपी पेक्षाही शंभर रुपये प्रती टन जास्त बिल येणार आहे व ही रक्कम एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल. व याप्रमाणे शेतकऱ्यांना मागील हंगामातील ऊसाला २५०० रुपये प्रती टन दर मिळेल, असे प्रतिपादन या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांचे शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्याच्या विसाव्या गळीत हंगामाचा गव्हाणीचे पूजन करून व मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे माहिती देत होते. सकाळी आमदार संजय मामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, सभापती विक्रम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे, सर्व संचालक व कारखान्याचे विभाग प्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदनाताई हुंबे यांचे हस्ते सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.

अधिक माहिती देताना आ. बबनदादा शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे निर्यात साखरेवरील अनुदान वेळेवर मिळाले नाही. केंद्राकडे अद्यापही 63 कोटी रुपये येणे बाकी आहे. कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११ कोटी युनिट वीज महामंडळास निर्यात केली आहे. यावर्षीच्या चालू गळीत हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक मजुरांची वारंवार तपासणी करून त्यांना उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना सर्व आरोग्य सुविधा जागेवरच पोहोचवण्यात येणार आहेत.

याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट १ मध्ये २० हजार ६६० हेक्टर (५१ हजार ५५० एकर) ऊस क्षेत्राची नोंद असून यामधून २२ लाख टन उसाचे गाळप करण्याचा मानस आहे. तसेच करकंब येथील युनिट २ कडे सहा लाख हेक्टर (पंधरा हजार एकर) उसाची नोंद असून या ठिकाणी पाच लाख टन गाळप करण्यात येणार आहे व या युनिटचा गळीत हंगाम शुभारंभही आज होत आहे. या हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीसाठी २० हार्वेस्टर, १२०० ट्रक्स, ट्रॅक्टर आणि युवराज व १५०० बैलगाड्या तयार आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणे १५ ऑक्टोबर पासून युनिट १ व युनिट २ मध्ये रितसर गाळप सुरू होणार असून सर्व यंत्रणा सज्ज आहे.

या कार्यक्रमास आमदार संजय मामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे संचालक बबन बापू पाटील, पोपट चव्‍हाण, वामन उबाळे, सुरेश बागल, हिंमत सोलंकर, कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे, जनरल मॅनेजर सुहास यादव, विभाग प्रमुख सीएस भोगाडे, पी एस येलपले, मुख्य शेतकी अधिकारी संभाजी थिटे, सुनील बंडगर, परचेस विभागाचे जगदीश देवडकर, सुरक्षा विभागाचे एफ एल दुंगे, सुनिल शिंदे कामगार प्रतिनिधी अनिल वीर, प्रशासन विभागातील शशिकांत पवार यांचे सह कामगार व काही शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे दरम्यान सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा