पुणे, १४ ऑक्टोंबर २०२०: राज्यात १३ ते १७ ऑक्टोबर कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्षानं १३ ते १७ ऑक्टोबर कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून पुणे शहर व आसपासच्या परिसरात आपत्कालीन स्थितीचा अंदाज घेत सतर्कता बाळगण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशामध्ये पोलीस प्रशासन व आपात्कालीन व्यवस्थापन विभागाला सर्व तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील नदी व नाल्यांच्या ठिकाणी असलेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या व इतरही भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा भागांमध्ये पोलिसांनी लक्ष ठेवावं असं देखील सांगण्यात आलं आहे.
यासह ज्या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत त्या ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानंतर वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून असं घडल्यास जेसीबी व इतर उपकरणं तयार ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच आवश्यक असल्यास शहरातील जुन्या इमारती, मोडकळीस आलेली घरं, तसेच पाण्यापासून धोका असलेल्या वस्त्यांमधील लोकांना संभाव्य धोका पाहता सुरक्षित ठिकाणी हलवण्यचे आदेश देखील देण्यात आला आहे.
१३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत आपात्कालीन विभागाचे सर्व कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणेतील सर्व कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे. एसटी, रेल्वे सार्वजनिक वाहतूक तसेच वाहतुकीशी संबंधित सर्व सेवांमध्ये समन्वय राखण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. जेणेकरून आपात्कालीन परिस्थिती ओढवल्यास दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये व आपत्कालीन कार्य सुरळीतपणे करता येईल.
काय आहेत नागरिकांसाठी सूचना:
१. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
२. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकानी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावं, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा ध्यावा.
३. मुसळधार पावसामुळं उदभवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपात्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी जिल्ह्यामध्ये ०२०. २६९२३३७१ / १०७७ या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा.
४. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये,
५. DAMINI Lightening Alert हे अॅप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहीती देते. तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनाची माहीती देते. तरी सदरचे अॅप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
काय म्हणालं हवामान खातं
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळं आज तब्बल ५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळं आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे