नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२०: देशातील डोंगराळ भागा पासून ते मैदानी भागांत पर्यंत थंडीचा तडाखा कायम आहे. उत्तर भारतातील अधिक तर ठिकाणी शीतलहर आल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. या दरम्यान शनिवारी देशाची राजधानी दिल्लीमध्ये पारा खाली घसरून ३.९ अंशावर पोहोचला. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये डल सरोवर गोठले आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे झोजिला पास देखील बंद आहे.
काय आहे दिल्लीतील हवामान
दिल्लीला शित लहरीने थंडीचा चांगलाच तडाखा दिला आहे. शनिवारी दिल्लीचे किमान तापमान ३.९ अंश नोंदवण्यात आले जे या वर्षातील सर्वात कमी तापमान होते.
हवामान विज्ञान विभाग (आय एम डी) च्या म्हणण्यानुसार सफदरजंग वेधशाळेत किमान तापमान ४ डिग्री सेल्सिअसच्या खाली म्हणजेच ३.९ अंश नोंदवण्यात आले. तर कमाल तापमान २१.८ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान खात्याने सांगितले की, पश्चिम हिमालयात बर्फाच्छादित भागातून येत असणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील अनेक ठिकाणी थंडीचा प्रकोप कायम आहे. तथापि शीतलहर हळूहळू मंदावणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
मध्यप्रदेश मध्ये शीतलहर कायम राहणार
दरम्यान मध्यप्रदेश मध्ये थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मध्यप्रदेश मध्ये शीतलहरीचे प्रमाण कायम राहणार असून थंडी अशीच सुरू राहील. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ७ डिग्री सेल्सिअस वर घसरले आहे. हवामान खात्याने सांगितले की, मध्यप्रदेश मध्ये २४ डिसेंबर पर्यंत थंडीचा तडाखा कायम राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे