इंदापूर, २ जानेवारी २०२१: भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी, न्हावी (ता.इंदापूर) येथे १ जानेवारी १८१८ च्या विजयी लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ महाराष्ट्रातील जनता एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून विजय लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन व मानवंदना देत असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतीयांना प्रेरणादायी आहे. आज याठिकाणी शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तुत्वाने आपल्या देशासाठी हजारो वर्षासाठीचे मोठे रचनात्मक महान कार्य केले आहे.’
‘राज्यघटना, समता, सदभावना, सर्वधर्मसमभावनेच्या विचाराबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील गरीब असो श्रीमंत माणूस असो या सर्वांना लोकशाहीचा मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या विचारांची उपासना या बुद्ध विहाराच्या माध्यमातून व्हावी. युवकांनी हे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत.’
बापूराव घाडगे व समता सोशल क्लब न्हावी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ॲड.अशोक घोगरे, बापूराव घाडगे, बापू मारकड, पप्पू डोंबाळे, विजय भोसले, अनिल गायकवाड, सुनील कणसे, सुनील अवघडे, विनोद घोगरे, विशाल घाडगे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे