भारत हा एक कृषिप्रधान देश आहे, असे आपण लहानपणी पुस्तकात शिकलो असेल. जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने जाणारा आपला देश सर्वात जास्त कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो ज्या खेळण्यांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. थोडक्यात शेती हा आपल्या पूर्ण देशाचा मुख्य व्यवसाय आहे व त्याचा आपल्याला गर्व ही असला पाहिजे. परंतु कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर यासारखे मोठे दुर्भाग्य काय असेल.
सरासरी प्रत्येक ३० मिनिटामध्ये एक शेतकरी भारतामध्ये आत्महत्या करत आहे. ज्या देशांमध्ये जय जवान आणि जय किसान अशा घोषणा दिल्या जातात त्या देशामध्ये शेतकऱ्यांची अशी अवस्था असेल तर हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्भाग्य असावे. मागच्या दहा वर्षात जवळजवळ दहा करोड शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सतत असणारा दुष्काळ, सरकारच्या अपूर्ण सेवा आणि सुविधा, पिकांना मिळणारा कमी भाव या सर्वांना वैतागून शेतकरी आपल्या जमिनी व घरे विकून शहरांच्या दिशेने वळू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी व्यवसायावर होणारा हा परिणाम भारतात मोठे संकट निर्माण करू शकतो कारण खाणे तर सर्वांना आवडते; पण शेती करणे हे कोणालाच आवडत नाही. शेतकरी होणे म्हणजे मध्यमवर्गीय पेक्षाही कमी असल्याचे समजले जाते. शेतकरी म्हणजे अडाणी ज्याला दलाला पासून ते सरकारपर्यंत सर्वच फसवू शकतात. शेतकरी होणे म्हणजे आज-काल कमीपणाचे वाटू लागले आहे.
शेती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती महत्त्वाची आहे हे सांगण्याची गरज नाही. देशातील ६० टक्के जनता कृषीवर आधारित आहे. कृषी हा भारताचा मुख्य व्यवसाय म्हणून ओळखला जातो. कृषी नंतर भारत जगामध्ये कोणत्या गोष्टीसाठी ओळखा जात असेल तर ते आयटी क्षेत्र आहे. जे उत्पन्न भारताला आयटी क्षेत्रामधून प्राप्त होते तेवढ्याच प्रमाणात उत्पन्न शेतीमधून आपल्या देशाला प्राप्त होते. यावरून अंदाज येतो की कृषी ही भारतीय अर्थव्यवस्थेत किती महत्त्वाची आहे.
भारत जगामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काही उत्पादने घेण्यामध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. कोकणातील आंबा हा जगप्रसिद्ध आहे भारतातून हा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. मसाला उत्पादनामध्ये भारत हा जगातला एक नंबरचा देश म्हणून ओळखला जातो. जगामध्ये सर्वात जास्त मसाल्याचे उत्पादन भारतामध्ये केले जाते. दरवर्षी भारतामध्ये १.५ मिलियन मसाल्यांचे उत्पादन केले जाते. भारतातून सर्वात जास्त केळीची निर्यात केली जाते. हे सगळं असतानाही असे कोणते कारण असेल ज्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. याची कारणे शोधायला गेले तर तशी भरपूर कारणे समोर येतात.
या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास सर्वात मोठे कारण कोणते असेल तर ते आहे आपले सरकार. दरवर्षी भारतामध्ये कितीतरी शेती उत्पादनाची नासाडी होते. पिकवलेला शेतमाल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार कडून कोणतीही व्यवस्था करून दिलेली नसते. तर दुसरीकडे सरकारी गोदामांमध्ये हजारो टन असलेल्या अन्नधान्य दरवर्षी खराब होऊन फेकून दिले जातात. काही दिवसांपूर्वीच समोर आले होते की पावसाच्या पाण्यामुळे गोदाम मधील कितीतरी धान्य हे फेकून देण्यात आले होते. भारतामध्ये जेवढ्या अन्नाची नासाडी होते हे ऑस्ट्रेलियाच्या एकूण उत्पादना एवढे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका वर्षात जेवढे अन्नधान्याचे उत्पादन केले जाते तेवढे अन्नधान्य फक्त भारतामध्ये फेकून देण्यामध्ये जाते ही किती मोठी गंभीर बाब आहे हे लक्षात घेतले पाहिजे. याहूनही गंभीर गोष्ट ही आहे ही अन्नधान्याची नासाडी झाल्यानंतर सरकार म्हणते की, देशात अन्नधान्याची कमतरता वाढत आहे व ही कमतरता भागवण्यासाठी त्याचा ऑस्ट्रेलिया मधून आपण अन्नधान्याची आयात करतो. परंतु हे मागवलेले अन्नधान्य येथे पिकवलेल्या अन्नधान्यांच्या किमतीच्या तुलनेत कितीतरी पटीने महाग असते. जर हाच भाव भारतातील शेतकऱ्यांना दिला तर कदाचित शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणारच नाही.
मंत्र्यांना आणि नेत्यांना पैसे खाता यावेत यासाठी बाहेरून अन्नधान्याची आयात केली जाते. देशात विपुल प्रमाणात शेतजमिनी असतानाही भारतावर ही वेळ येत असेल तर यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. केवळ सरकारी तिजोरी मधून पैसा कसा काढता येईल हा हेतू राजकारणी ठेवत असतात आणि एका बाजूला जेव्हा शेतकरी कंटाळून आत्महत्या करतो तेव्हा त्याचे सांत्वन करण्यासाठी मीडिया सह त्याच्या घरी भेट देतात. म्हणजे छापा हि यांचा आणि काटाही यांचाच. नाणे खोटे निघते ते फक्त शेतकऱ्याचे.
शेतकऱ्यांसाठी येणारे प्रत्येक सरकार वेगवेगळ्या योजना तयार करते परंतु या योजना फक्त कागदावरच येत असतात प्रत्यक्षात त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत ही नाही. याचा उल्लेख प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलाही होता. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पेरणी साठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्याच्यासमोर कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने एक तर त्याला आत्महत्या करावी लागते किंवा आपली जमीन विकावी लागते. यावर्षी मानसून चांगलाच लांबणीवर गेल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. राजकीय नेते सत्तास्थापनेच्या खेळामध्ये गुंतले आहेत तर एका बाजूला शेतकरी आपली पिके कशी वाचवता येईल याच्या तडजोडीत गुंतला आहे. शेतकऱ्यांचा खरा नेता कोण हे दाखवण्यासाठी या नेत्यांमध्ये चढाओढ चालू आहे व प्रत्येक ठिकाणी भेट देत आहेत. निवडणुका होऊन तीन आठवडे उलटून गेले असतानाही अजूनही सरकार स्थापन झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचणे अवघड झाले आहे.
शेतकऱ्यांनी शेती विमा जरी काढलेला असला तरी विमा कंपन्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई देण्यास नकार देत असल्याचेही समोर येत आहे. राजकीय नेते, नैसर्गिक आपत्ती आणि पिकांना मिळणारा काडी मोलाचा भाव या सगळ्यांमध्ये आजचा शेतकरी अडकून पडला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकमेकांमध्ये सहकार्य साधून देशातील शेतकऱ्यांची समस्या सोडवणे आवश्यक आहे. नाहीतर ती वेळ लवकरच येईल ज्या दिवशी भारतातील शेतकरी शेती करणे सोडून देईल. जी शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाते तो कना कमकुवत होत असताना दिसत आहे. सध्या भारतासमोर हे सर्वात मोठे संकट उभे येऊन ठाकले आहे.