मुंबई, १२ मे २०२१: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले. आरक्षणाबाबत काही दिवस अगोदर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. तसेच, आता लवकरच यासाठी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली जाणार आहे. राज्यपालांना निवेदन सादर केल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल त्या अनुषंगाने आमची आजची भेट होती. त्या निकालामध्ये सांगितलंय की आरक्षण देण्याचा अधिकार राज्याच्या नसून केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना राष्ट्रपतींकडे आणि केंद्र सरकारकडे पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
न्युज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे