पुणे, १० सप्टेंबर २०२१: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर राणे विरुद्ध शिवसेना असा वाद तीव्र झालेला असताना आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांना लुकआउट सर्क्युलर नोटीस बजावली आहे. डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटिस जारी करण्यात आली आहे. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटिस पाठवली आहे.
नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून ४० कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. राणे कुटुंबियांनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी कर्ज घेतलं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे सहअर्जदार आहेत.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. ३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटिस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेलं आहे. मात्र, लुकआट नोटीस जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट नोटिसवर आता राणे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे