सांगली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता

सांगली, 24 नोव्हेंबर 2021: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने 17 जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, जतमध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ आमदार विक्रम सावंत हे पराभूत झाले आहेत.

अत्यंत चुरशीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीसाठी 21 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीमध्ये 85 टक्के मतदान झालं. याच निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. तर जत सोसायटी गटात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मंत्री विश्वजित कदम यांचे मावस भाऊ विद्यमान संचालक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यांचे विरोधक असलेल्या भाजपच्या प्रकाश जमदाडे यांना 45 मतं मिळाली तर विक्रम सावंत यांना 40 मत मिळाली आहेत.

लक्षवेधी ठरलेल्या लढतीमध्ये भाजपाचे राहुल महाडिक, संग्रमसिंह देशमुख, सत्यजित देशमुख आणि प्रकाश जमदाडे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे आमदार व सांगली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांना धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ऐनवेळी निवडणुकीत भाजपच्या उमेदवार घेणारे प्रकाश जमदाडे यांनी विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा