अनाथांची माय हरपली, पद्मश्री पोरकी झाली

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ वर्षी निधन झाले. पुण्याच्या गॅलॅक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अखेर माई सगळ्यांना पोरक्या करुन गेल्या.

सिंधूताई अनाथांची माय हेच समीकरण होऊन गेलं होतं. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचे २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले. तिथून सुरुवात झाली त्यांच्या संघर्षाला. नवऱ्याने टाकले, गावाने हाकले आणि आईने ढकलले. अशी स्थिती झालेल्या सिंधूताईंनी भीक मागून आयुष्य काढले. स्मशानात रात्र जागवली आणि स्वत:ला जगवले . तिथूनच त्यांना ममतेची प्रेरणा मिळाली आणि सुरु झाला प्रवास ममता बाल सदनाचा.

१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या सदनातला सर्वात मोठ्या वयाचा मुलगा हा त्यांचा नवरा होता, ज्याने त्यांना चारित्र्यावर संशय घेऊन घराबाहेर काढले होते. अशी ही माय आज सगळ्यांना पोरकं करुन गेली .

ममता सदन संस्थेबरोबरच ताईंनी
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
या संस्थांही स्थापन केल्या.

सिंधूताईंना त्यांच्या कार्याबद्गल अनेक पुरस्कार मिळाले. नुकताच २०२१ मध्ये ताईंना पद्मश्री पुरस्काराने नावाजण्यात आले होते.
त्याचबरोबर
१.महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
२.पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’
३.महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’
४.मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार
५.सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार
६.२००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.
७.प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार
८.डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार
९.पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

अशी ही अनाथांची माय आता सगळ्यांना पोरकं करुन गेली आणि मायेचं छत्र मुलांसाठी सोडून गेली.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे ताईंनी आपल्या कृतीतून दाखवल आणि ममतेचं ऋण फेडून नव्या प्रवासाला ही माय निघून गेली.
अशा या मातेला न्यूज अनकटची श्रंद्धांजली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा