सांगली, 4 फेब्रुवारी 2022: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात ‘पुष्पा’ चित्रपटासारखी चोरी झाल्याची बातमी समोर आलीय. पोलिसांना एक ट्रक सापडला असून त्यात 2 कोटी 45 लाख रुपयांचं लाल चंदन गुपचूप नेलं जात होतं. सांगली पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करून हा ट्रक पकडला. त्याचबरोबर एका आरोपीलाही अटक करण्यात आलीय.
यासीन इनायथुल्ला नावाचा आरोपी कर्नाटक-आंध्र सीमेवरून महाराष्ट्रात जात असल्याची माहिती मिळाली आहे. लालचंदन ट्रकमध्ये आणलं जात असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. अशा परिस्थितीत आरोपी सांगलीत पोहोचताच त्याला मेरज नगर येथून अटक करण्यात आली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटातून आरोपी प्रेरित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी ट्रकमध्ये लाल चंदन तर ठेवलं होतेच पण त्याशिवाय अनेक फळांच्या पेट्याही वर ठेवल्या होत्या.
ट्रकच्या वर कोरोना अत्यावश्यक उत्पादनांचे स्टिकरही लावण्यात आले होते. अशा स्थितीत फसवण्याची पूर्ण तयारी होती. मात्र पोलिसांना आधीच माहिती मिळाल्यानं नाकाबंदी करून हा ट्रक जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध 379, 34 व वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तूर्तास या संपूर्ण प्रकरणात हे किती मोठं नेटवर्क आहे, या नेटवर्कमध्ये कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पुष्पा चित्रपटाबद्दल सांगायचं तर, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनही त्यात लाल चंदनाची तस्करी करतो. त्या चित्रपटातही पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणातही एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणं कट रचण्यात आला होता पण शेवटी आरोपी पकडला गेला आणि पोलिसांनी एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे