पुणे, 4 फेब्रुवारी 2022: पुण्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात 7 मजुरांचा मृत्यू झालाय, तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी बचाव मोहीम राबवून कामगारांची सुटका केली.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं की, अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी आहेत. त्याचवेळी, वाहतूक पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील शास्त्री वाडिया बंगल्याजवळ हा अपघात झाला. येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळघरात रात्री उशिरा काम सुरू होते. यादरम्यान अचानक पार्किंगमध्ये मोठा लोखंडी स्लॅब पडला.
आयुक्त पुढे म्हणाले की, स्लॅब टाकण्यासाठी 16 मिमी जड लोखंडी सळ्यांपासून जाळी तयार करण्यात आली होती. कट्ट्याच्या साहाय्याने उभे असलेले कामगार कामात मग्न होते. अचानक ही लोखंडी जाळी काम करणाऱ्या 10 मजुरांवर पडली.
जड जाळीखाली दबलेल्या मजुरांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. जाळीत गाडलेल्या मजुरांना कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 3 मजुरांवर उपचार सुरू आहेत. येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. हे मजूर कोठून आले आणि कधीपासून येथे काम करत होते, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे