मुंबई, 24 मे 2022: जगात एक नवीन आजार वेगाने पसरत आहे, त्याचं नाव आहे ‘मंकीपॉक्स’. ताज्या अहवालानुसार, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे 90 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही सर्व प्रकरणं यूके, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 12 देशांमध्ये आढळून आली आहेत. मात्र, भारतात अद्याप एकही केस आढळलेली नाही. दरम्यान, मुंबई विमानतळ आणि बीएमसी मंकी वायरस बाबत सतर्क आहेत.
आदेश जारी करताना, बीएमसीने सांगितलं की ज्यांनी आफ्रिकन देश आणि अशा इतर ओळखल्या गेलेल्या देशांतून प्रवास केला आहे जेथे मंकीपॉक्सची लक्षणं आढळली आहेत, त्यांची चाचणी करणं आवश्यक आहे. मुंबई विमानतळालाही प्रवाशांची तपासणी करण्यास सांगितलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांना मंकीपॉक्सबाबत सतर्क राहण्यास सांगितलंय.
WHO ने देखील मंकीपॉक्सबद्दल चेतावणी दिलीप. डब्ल्यूएचओने म्हटलंय की, ज्या देशांमध्ये हा संसर्ग पसरला नाही तेथे मंकीपॉक्सची अधिक प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात. काही कारणास्तव शारीरिक संपर्कात आलेल्या लोकांमध्ये मंकीपॉक्स पसरत आहे.
मंकीपॉक्स म्हणजे काय
मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणू आहे जो गोवर सारखा आहे, परंतु गोवर पेक्षा कमी गंभीर आहे. मंकीपॉक्स विषाणू पॉक्सविरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील आहे. 1958 मध्ये, माकडांमध्ये दोन गोवर सारखे आजार आढळून आले, त्यापैकी एक मंकीपॉक्स होता.
चेंबूर येथील जैन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग फिजिशियन आणि इन्फेक्शन स्पेशालिस्ट डॉ. विक्रांत शाह यांच्या मते, मंकीपॉक्स हा एक झुनोसिस रोग आहे जो आफ्रिकेतील प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्याचा प्रसार इतका सामान्य नाही कारण तो संक्रमित व्यक्तीच्या पू किंवा लाळेच्या संपर्कातून पसरतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे