मुंबई, 12 जून 2022: अखेर काल मुंबईत मान्सूनचं आगमन झालं. हवामान खात्याने याची माहिती ट्वीट करून दिली. यासह राज्यभर देखील मान्सूनचं आगमन झाल्याचं काल दिसून आलं. राज्यातील अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. याबरोबरच उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना देखील दिलासा मिळाला.
शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, सांताक्रूझ वेधशाळेत 15.55 मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबात पाऊस झालाच नाही. पण वीकेंडसाठी, IMD ने शहरासाठी येलो इशारा जारी केलाय, ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आलीय.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, पूर्व गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात पुढं सरकला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. त्याचबरोबर पुढील 5 दिवस काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे