नवी दिल्ली, 21 जून 2022: देशभरात अग्निपथवरून सुरू असलेला गदारोळ थांबण्याचं नाव घेत नाही. सोमवारी विद्यार्थ्यांच्या भारत बंदनंतर आता 24 जून रोजी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) देशव्यापी बंद पुकारलाय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून रोजी तिन्ही लष्करप्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.
SKM नेते राकेश टिकैत यांनी कर्नाल, हरियाणात सांगितलं की, त्यांची संघटना अग्निपथ योजनेला विरोध करेल. टिकैत म्हणाले की, एसकेएम अग्निपथ योजनेच्या विरोधात 24 जून रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयात आंदोलन करेल.
याआधी सोमवारी विद्यार्थ्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता, त्याला विरोधकांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून आला. दिल्ली, नोएडा, गुडगावसह एनसीआरमधील अनेक रस्ते तासन्तास ठप्प होते.
दिल्लीच्या सीपीमध्ये रस्ते रोखण्यात आले. सीपीला लागून असलेल्या जनपथ आणि बाबा खरक सिंग मार्गावर प्रचंड जाम होता. टिळक पुलावर रेल्वेसमोर गोंधळ घालणाऱ्या 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, रणदीप सुरजेवाला, शक्ती सिंह, इम्रान प्रतापगढ़ी यांनी जंतरमंतरवर निदर्शनं केली.
भारतीय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीच्या शिवाजी ब्रिज रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवत होते. थांबलेली ट्रेन श्रीगंगानगर (राजस्थान) येथे जात होती. काँग्रेस कार्यकर्त्यांना तेथून हटवून गाडी रवाना करण्यात आली. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्येही काँग्रेसने निदर्शने केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे