द्रौपदी मुर्मूंच्या आधीही देशाला मिळाले असते आदिवासी राष्ट्रपती, जाणून घ्या ही कहाणी

11

पुणे, २२ जुलै २०२२: द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांचं राष्ट्रपती होणं हे ऐतिहासिक आहे, त्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. ज्या मोठ्या फरकाने त्यांनी हा विजय नोंदवला आहे त्यामुळं हा टप्पा आणखी खास बनलाय. पण द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातून राष्ट्रपती होण्याआधी देखील देशाला आदिवासी समाजातून राष्ट्रपती मिळाले असते. १० वर्षांपूर्वी ही संधी होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.

हा किस्सा २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीबद्दल आहे. त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार होतं आणि पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग होते. त्यावेळी काँग्रेसने प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं होतं. विरोधी पक्ष कोणताही उमेदवार उभा करणार नाही आणि प्रणव मुखर्जी कोणत्याही अडथळ्याशिवाय रायसेना पर्यंत पोहोचतील, अशी पक्षाला पूर्ण आशा होती. मात्र विरोधकांनी काँग्रेस सोबत एक मत केलं नाही. अशा परिस्थितीत तत्कालीन विरोधकांनी पीए संगमा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवलं होतं. २०२२ मध्ये द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देऊन भाजपने जी आदिवासी पैज लावली, तशाच प्रकारचे काम २०१२ मध्ये विरोधकांनी केलं होतं.

वास्तविक पीए संगमा हे आदिवासी समाजातील होते. पूर्णो आगितोक संगमा यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ रोजी ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील रमणीय पश्चिम गारो हिल जिल्ह्यातील चापाहाटी गावात झाला. मेघालयातील एका छोट्या आदिवासी गावातून साध्या जीवनाची सुरुवात करून, पीए संगमा आपल्या क्षमता, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर लोकसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. संगमा हे अष्टपैलुत्वाने समृद्ध होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी व्याख्याता, वकील आणि पत्रकार म्हणूनही काम केलं. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते पक्षाच्या पदापर्यंत झपाट्याने पोहोचले.

पण, त्यानंतर १९९९ साली काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्यासह पी.ए. संगमा यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी शरद पवार जसजसे जवळ आले, तसतसे पी.ए. संगमा यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षात विलीन होऊन राष्ट्रवादी तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्यानंतर २००६ मध्ये ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संसदेत पोहोचले. आता त्यांनी अनेक विचारवंतांसोबत राजकारण केल्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसेच झालं होतं. या कारणास्तव, २०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना विरोधकांनी उमेदवार बनवलं होतं.

पण यावेळी जसा द्रौपदी मुर्मू यांचा एकतर्फी विजय झाला, तसाच प्रकार २०१२ मध्येही पाहायला मिळाला. त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना ७ लाख १३ हजार ७६३ मतं मिळाली होती. त्याचवेळी पीए संगमा यांना केवळ ३,१५,९८७ मतांवर समाधान मानावं लागलं. याच कारणामुळं १० वर्षांपूर्वी देशाला आदिवासी राष्ट्रपती मिळू शकला नव्हता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे