जम्मू – काश्मीर: २५ ऑगस्ट २०२२: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सीमा चौकीवर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्याला भारतीय जवानांनी आपले रक्त दिले आहे. बुधवारी माहिती देताना लष्कराने सांगितले की, घुसखोरी आणि २१ ऑगस्ट रोजी सीमा चौकीवर झालेल्या हल्ल्यादरम्यान दहशतवादी जखमी झाला होता, त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी त्याला रक्ताच्या तीन बाटल्या दिल्या. ३२ वर्षीय तबराक हुसेन असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून आला होता.
लष्कराच्या ८० इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर कपिल राणा यांनी सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी पहाटे झांगढमध्ये तैनात असलेल्या सतर्क जवानांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे दोन ते तीन दहशतवाद्यांच्या हालचाली पाहिल्या.
ते म्हणाले, एक दहशतवादी भारतीय चौकीजवळ आला आणि कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्याला आव्हान दिले. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दहशतवादी गोळी लागल्याने जखमी झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, मागे लपलेले दोन दहशतवादी घनदाट जंगलाच्या आडून पळून गेले. ते म्हणाले, “जखमी पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आणि त्याच्यावर तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासोबतच शस्त्रक्रिया करण्यात आली.”
३० हजार रुपयांसाठी हल्ला करायला आला दहशतवादी
ब्रिगेडियर राणा यांनी सांगितले की, अधिक चौकशीत या दहशतवाद्याने भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा कट आखल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे कर्नल युनूस चौधरी यांनी आपल्याला पाठवून ३०,००० रुपये (पाकिस्तानी चलन) दिल्याचे हुसैन याने उघड केले.
हुसैनने दीर्घकाळ दहशतवादाशी संबंध असल्याची कबुली दिली असून पाकिस्तानी लष्कराच्या मेजर रज्जाकने आपल्याला प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. त्याने लष्कराच्या रुग्णालयात सांगितले की, माझी फसवणूक झाली आणि त्यानंतर भारतीय सैन्याने मला पकडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड