लातूर, ता. १९ नोव्हेंबर २०२२ : लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले असून, विशेष म्हणजे या धक्क्याचे केंद्र हे पुन्हा किल्लारी परिसर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे. हा भूकंप सौम्य प्रमाणात २.४ रिस्टर स्केल नोंदवण्यात आला असल्याचेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले आहे.
लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरातील गावांत
शनिवारी (ता. १९ नोव्हेंबर) पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रात्री लोक गाढ झोपेत असताना दोनच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला व जमीन हादरली. यामुळे किल्लारी, किल्लारी वाडी, यळवट, शिरसल, मंगररूळ, जुने किल्लारी, एकोंडी गावातील नागरिक घराबाहेर आले.
दरम्यान, घाबरून नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. दरम्यान, या धक्क्याने जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारीत भूकंप झाला होता. शनिवारच्या सौम्य धक्क्याने येथील नागरिकांच्या मनात २९ वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील