गावापासून जगापर्यंत : खरंच आजची स्त्री सुरक्षित आहे?

ओठी हसू, नयनी पाणी; स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी

पिंपरी-चिंचवड, २० नोव्हेंबर २०२२ : औरंगाबाद शहरात शिकवणीचा वर्ग संपल्यानंतर संबंधित मुलगी आपल्या घरी जाण्यासाठी एका रिक्षात बसली. काही अंतर दूर गेल्यानंतर रिक्षाचालकानं संबंधित अल्पवयीन मुलीची छेड काढली. यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारली. रविवारी (ता. १३ नोव्हेंबर) ही घटना घडली.

नाशिकला शालेय मुलीची भररस्त्यात छेड
नाशिक : ही घटना ताजी असतानाच नाशिक येथेही शनिवारी (ता. १९) पाथर्डी फाटा परिसरातील एका शाळेच्या परिसरात शालेय मुलीची भररस्त्यात छेड काढल्याच्या संशयातून नागरिकांनी मद्यपी युवकाला भररस्त्यात चोप दिल्याने परिसरातील टवाळखोरांवर नागरिकांनी जरब निर्माण केला. शालेय मुलीनेही रुद्रावतार घेत युवकाला काठीने चोप देत आपला संताप व्यक्त केला.

लोहगाव येथे छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्याने एका पालकावर कोयत्याने वार
पुणे : पुण्यात लोहगाव येथेही शनिवारी (ता. १९) शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारल्याने टोळक्याने एका पालकावर कोयत्याने वार केले. या घटनेत पालक गंभीर जखमी झाला. शाळेच्या परिसरात दहशत माजवून टोळके पसार झाले. उमेश खांदवे (वय ४०, रा. लोहगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. खांदवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पन्हाळा येथे गुरुजीचे असभ्य वर्तन; मुलींनी शाळेला जाण्यास दिला नकार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मुलींनी शाळेला जाण्यास का नकार दिला? याच्या चौकशीत पालकांना सुन्न करणारा धक्कादायक प्रकार उजेडात आला. शिक्षकच शाळेतील मुलींशी असभ्य, लैंगिक वर्तन करीत असल्याचे चव्हाट्यावर आले. याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी, की असभ्य, लैंगिक वर्तनाचा आरोप असलेल्या शिक्षक हा ७० टक्के अपंग आहे. त्याच्याकडे शाळेतील चौथीचा वर्ग आहे. वर्गात आल्यावर अभ्यासाचे निमित्त काढून तो विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत होता. गुरुजीच्या असभ्य कृतीच्या भीतीने मुलींनी चक्क शाळेकडेच पाठ फिरविली. नियमाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी अचानक शाळेला का जात नाहीत, याची पालकांनी चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आठवड्यापूर्वी उघडकीस आलेल्या या प्रकाराचा पालकांना जबर धक्का बसला. त्यामुळे बदनामीच्या भीतीने अद्याप कोणीही तक्रार दिलेली नाही. मात्र, याबाबत पालकांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन या प्रकाराचा जाब विचारला; तर शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाबाबत ग्रामस्थांचा उद्रेक झाला. संबंधित ग्रामपंचायतीने या घटनेची त्वरित चौकशी होण्याबाबत पोलिस ठाणे, गटविकास अधिकारी व पंचायत समिती गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या घटनेची माहिती मिळताच संभाजी ब्रिगेडने शाळेला भेट देत या शिक्षकाला त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

खडकीतील शाळकरी मुलीवर बलात्कार;एका युवकाविरोधात खडकी पोलिसांत गुन्हा
पुणे : शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका युवकाच्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणी साई गायकवाड (वय १९, रा. मुंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गायकवाड याच्याशी मुलीची ओळख झाली होती. गायकवाडने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती झाली. खडकी भागातील एका रुग्णालयात मुलगी प्रसूत झाली. तेव्हा नवजात अर्भक मृत असल्याचे आढळून आले.

जळगावात अल्पवयीन मुलीचे अपहरण;एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील शिरसोली रोडवरील एका महाविद्यालयातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. १७) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावातील ही अल्पवयीन मुलगी जळगाव-शिरसोली रोडवर असलेल्या महाविद्यालयात आली होती. मात्र, घरी परतली नाही. तिचा शोध घेतला असता, ती कुठेही आढळून आली नाही.

ओरिसातील महाविद्यालयात अश्लाघ्य प्रकार;कॉलेज रॅगिंग प्रकरणी सिनिअर्स ताब्यात
दरम्यान, शनिवारी (ता. १९) ओरिसातील गंजम जिल्ह्यातील बेहरामपूर येथील बिनायक अकादमी महाविद्यालयात रॅगिंगच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि मुलाला जबरदस्तीने चुंबन घेण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. यात सहभागी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोन विद्यार्थी अल्पवयीन आहेत. त्याचवेळी महाविद्यालय प्रशासनाने या घटनेत सहभागी असलेल्या १२ विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

एकंदरीत या देशात महाभारताच्या काळापासून ते आजवर महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबलेले नाहीत; परंतु त्या काळापेक्षा आताच्या काळात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार बदललेला आहे. महिलांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात आहे. त्यात आपलल्या संस्कृतीचाही विचार करणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार आपली संस्कृती, आपले संस्कार बदलले गेले. जे चांगले ते बाजूला राहत आहेत आणि जे वाईट आहे ते स्वीकारले जात आहेत. आणि त्यातूनच आपल्या देशाची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. आज बलात्काराच्या घटनांमुळे रोजची वृत्तपत्रे भरू लागली आहेत.

स्त्रियांचा विनयभंग, छेडछाड होत असताना त्याचे अनेकजण प्रत्यक्षदर्शी असतात; परंतु त्या क्षणाला कुणालाही असे वाटत नाही, की गुन्हे करणाऱ्यांना पकडून व पोलिसांच्या ताब्यात द्यावे; पण लोकांचा पोलिस चौकीतला अनुभवही अजून विश्वासदर्शक वाटत नाही. प्रथमदर्शी अहवाल घेण्यास टाळाटाळ करणे, मग तक्रार करणाऱ्याला किंवा प्रत्यक्षदर्शीला वारंवार साक्षीसाठी पोलिस ठाण्यात बोलावणे येते. आणि यालाच लोक घाबरतात व गुन्हा घडत असला, तरी ते अशा भानगडीत पडत नाहीत; तसेच स्त्रीविषयक कायदा असून तो काय कामाचा, बलात्कारित आरोपींचे तेलंगणाच्या धर्तीवर इन्काउंटर करण्याची गरज वाटू लागली. किंबहुना आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा