लष्करमध्ये पाणी असूनही टंचाई! पाणीचोरी, जीर्ण जलवाहिन्या, अनियंत्रित वापराचा फटका

पुणे १३ फेब्रुवारी २०२५ : लष्कर परिसरातील नाव मोदीखाना भागात मुबलक पाणीपुरवठा असूनही नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिलांचे प्रश्न अधिक गंभीर बनले असून, शासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

पाणीचोरी: मुख्य जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात

पाणीचोरी होत असल्याने अधिकृत नळधारकांना कमी दाबाने किंवा अल्प वेळेसाठी पाणी मिळते. काही हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था अनधिकृत नळजोडणी व मोटारींच्या साहाय्याने बेसुमार पाणी वापर करत आहेत. प्रशासनाचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
जीर्ण जलवाहिन्या: लष्कर भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार पाईप फुटल्याने पाण्याची मोठी गळती होते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते.

प्रशासनाचे दुर्लक्ष: स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी समस्याग्रस्त भागात भेटी देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. तात्पुरते उपाय केले जात असले तरी पाणीपुरवठा नियमित होत नाही.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा: परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर नागरिकांनी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून जलवाहिन्या बदलणे, अनधिकृत नळजोड बंद करणे आणि पाणीचोरीवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे: “आम्ही पाणी चोरी पकडण्याचा प्रयत्न करतो, तरी नागरिकांनी कुठे चोरी होत असेल तर आम्हाला तत्काळ कळवावे.” – रश्मी पाटील, अभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे