अतिरेकी गटाशी संबंधित २५ लोक ताब्यात; जर्मनीमध्ये सशस्त्र उठावाची योजना

पुणे, ८ डिसेंबर २०२२ : जर्मनीतील अतिरेक्यांच्या सुमारे १३० ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी छापे टाकले. यादरम्यान, पोलिसांनी राईषबुर्गर या अतिरेकी गटाशी संबंधित २५ सदस्य आणि समर्थकांना ताब्यात घेतले आहे. हे लोक बळाच्या माध्यमातून देशातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, राईषबुर्गर गटाचे सदस्य जर्मनीला कायदेशीर राज्य मानत नाहीत. यातील काही लोक जर्मन साम्राज्याच्या राजेशाहीला वाहिलेले आहेत. तर काही लोक नाझी विचारसरणीने प्रेरित आहेत. यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे, की जर्मनी अजूनही सैन्याच्या ताब्यात आहे. तथापि, क्रेमलिनच्या मते, या प्रकरणात रशियाच्या सहभागाचा प्रश्नच उद्भवत नाही. याप्रकरणी कायद्यानुसार पूर्ण ताकदीनिशी कारवाई केली जाईल, असेही जर्मन सरकारने म्हटले आहे. लष्करी गुप्तचर सेवेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सैनिक आणि गरज पडल्यास सैन्यात बोलावले जाऊ शकणार्‍या अनेक लोकांचीही चौकशी करण्यात आली.

या संशयित अतिरेक्यांवर कारवाई करताना, ३,००० अधिकाऱ्यांनी देशातील १६ पैकी ११ राज्यांमध्ये १३० ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत २२ जर्मन नागरिक आणि एका रशियनसह ३ जणांना दहशतवादी गटात सदस्यत्व असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.
दहशतवादी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांमध्ये ७२ वर्षीय निवृत्त लष्करी कमांडर आणि उजव्या पक्षाच्या माजी खासदारांचाही समावेश आहे. एका वकिलाने सांगितले, की या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २५ जणांचा संसदेत शस्त्रांसह जबरदस्तीने प्रवेश करण्याचा निश्चित हेतू होता. यापैकी २२ जण जर्मनीचे नागरिक आहेत. उर्वरित ३ लोकांपैकी एक रशियन महिला देखील आहे जी या लोकांना समर्थन देत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा