भरतपूर, १५ डिसेंबर २०२२ : पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याविषयी मोदी सरकारमधील एका मंत्र्याने धक्कादायक विधान केले आहे. नेहरू ड्रग्ज घेत, तर गांधी दारू पीत होते असा दावा केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांनी राजस्थानमधील भरतपूर येथे आयोजित नशा मुक्ती जागरण अभियान कार्यक्रमात केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ड्रग्ज सेवन करायचे. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या मुलाबाबतही त्यांनी असाच दावा केला. ते पुढे म्हणाले की, अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केले आहे. त्यामुळे अमली पदार्थाच्या हानीबाबत लोकांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे तसेच दारूची दुकाने देखील बंद करण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ते नेहमी ड्रग्जच्या विरोधात लोकांना जागरूक करत असतात. यापूर्वी मंत्री कौशल किशोर यांनी ट्विट करून लोकांना ड्रग्ज सोडण्याचे आवाहन केले होते.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, मी स्वत: खासदार झालो, माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य अंमली पदार्थांच्या व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण मला आता हेच हवे आहे की, ड्रग्जमुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल गमावू नये. अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.