फलटण, ता. ७ फेब्रुवारी २०२३ : शेतीमध्ये तंत्रज्ञानाबरोबरच नवनवीन बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेणे आजच्या काळामध्ये गरजेचे बनले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
लोणंद येथे नुकतेच शरद कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन लोणंद तालुका खंडाळा येथील साद प्रतिष्ठान, सुवर्णगाथा प्रतिष्ठान, रामराजे नाईक निंबाळकर प्रतिष्ठान, ग्रीनफिल्ड कृषी मॉलच्या वतीने आयोजित शरद कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, दत्तानाना ढमाळ हे उपस्थित होते.
दुष्काळी खंडाळा व फलटण भागातील शेतकऱ्यांसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे योगदान आहे. दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याबरोबरच येथील बळिराजाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यामध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
लोणंद येथील कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी एक पूरक व माहिती देणारे असे प्रदर्शन असून, या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी, तसेच ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार