फलटण पोलिसांनी गायी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; ३३ लाख ५५ हजारांचे गोधन, दोन वाहने जप्त

फलटण, २१ फेब्रुवारी २०२३ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गायी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या फलटण ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून सर्वांत मोठे गोधन जप्त केले असून, सुमारे ३३ लाख ५५ हजार किमतीच्या नऊ जर्सी गायी, दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतून जर्सी गाय चोरणाऱ्यांच्या संखेत वाढ झाली होती. जर्सी गायी चोरांना आळा कसा बसेल, यासाठी पोलिसांकडून उपाययोजना सुरू होत्या; परंतु गोपीनीय माहितीच्या अनुषंगाने मौजे भांडवली (ता. माण) येथील विनोद निवृत्ती खरात, संतोष श्यामराव सोनटक्के, तर तोंडले (ता. माण) येथील सतीश रमेश माने यांना मुद्देमालासह पोलिसांनी शितापीने पकडले.

वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केल्यानंतर सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधितांना फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत, सातारा जिल्ह्यातील औंध, मेढा, लोणंद पोलिस स्टेशन हद्दीत सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार विविध गुन्ह्यातील सुमारे ३३ लाख ५५ हजार किमतीच्या नऊ जर्सी गायी, दोन वाहने जप्त करण्यात आली. यामधील तीन आरोपींना अटक केली असून, तीन आरोपी फरारी आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या सूचनेनुसार फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर आरगडे, प्रमोद दीक्षित, पोलिस फौजदार राऊत, पोलिस नाईक अभिजित काशीद, पोलिस नाईक अमोल जगदाळे, पोलिस कॉन्स्टेबल महेश जगदाळे, विक्रम कुंभार यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा