फलटण, १२ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासमवेत हवाई पाहणी केली
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्ग ९६५ हा २३४ किलोमीटर लांबीचा मार्ग हडपसर-पुणे-सासवड- जेजुरी-निरा-लोणंद-फलटण-नातेपुते- माळशिरस-बोंडले -वाखरी-पंढरपूर असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण बारा पालखी स्थळे असून, या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत- महात्म्यांची शिल्पे, भित्तचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर आधारित काम करण्यात येणार आहे. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल; तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
महामार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, यामध्ये इतर चंदन, सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ,चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूंस १८८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा पालखी मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी स्वतः आग्रही असून, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील