हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत वाफाळलेल्या चहाची मजाच न्यारी

चहावाल्यांना ‘अच्छे दिन’; दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

पिंपरी-चिंचवड, २२ नोव्हेंबर २०२२ : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुण्यासह जळगाव, नाशिक, औरंगाबाद गारठले असून, या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत वाफाळलेला चहा प्यायची मजा काही औरच. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्‍हणावा लागेल. सकाळ आणि दुपारचा चहा न चुकता घेतलाच जातो. चाकरमानी तर टपरीवर चहा प्यायला येऊन उभा राहतोच. अर्थात, चहाचा एक प्याला घेतला की मूड फ्रेश होतो. पाच दशकांपूर्वी चहा हा जास्‍तकरून हॉटेल्‍समध्‍ये मिळत असे; परंतु कालांतराने चहा रस्‍त्‍यावर आला. गिरणी व कारखान्‍यांच्‍या गेटजवळ ‘आण्णा’, ‘आप्‍पा’ चहावाला दिसू लागला. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गरम चहा देणारे विक्रेते कामगारांसाठी मोठे आधार होते. कोळशाच्या शेगडीवर केल्या जाणारी चहाची चव ही वेगळीच होती.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणाचा आनंद घेणाऱ्या पिंपरी-चिंचवडवासीयांनी चहाचे घोट-पे-घोट लगावण्यास कुठलीही कंजुषी केलेली नाही. त्यामुळे शहरातील चहावाल्यांना खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत. चहाचे वेड आपल्याकडे पूर्वापार आहे. ईशान्य भारतात नीलगिरी पर्वतरांगांत बौद्ध भिक्खू चहाची शेती करीत होते, असे दस्तऐवज आपल्याकडे आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या चहाचे विविध प्रकार आहेत. असा हा चहा सध्या सुपरहिट ठरला आहे. गल्लीबोळातला, चौका-कट्ट्यावरचा, मुख्य मार्गावरचा वा आडवळणावरचा कुठलाही चहावाला मागील दोन दिवसांपासून दु:खी नाही. कारण, एरवी होणाऱ्या मिळकतीपेक्षा हुडहुडी भरविणाऱ्या थंडीच्या दिवसांत चहाविक्रेत्यांचा अधिकचा गल्ला होऊ लागला आहे. त्यातच चहाचे दर सात रुपयांवरून दहा ते बारा रुपये झाले असून, सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘चला ना चहा घेऊ’, ‘चलो ना टपरी पे’,
‘बस क्या, चाय तो पिलाव अब’ असे खास स्टाइलबाज संवाद सर्वत्र ऐकू येत आहेत.

शौकिनांचे म्‍हणणे, मूड फ्रेश होऊन येते तरतरी…
शरीराला हानिकारक असला, तरी चहा तसा अनेकांच्या आवडीचे पेय. मग हिवाळा, पावसाळा असो की उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये गरम चहाचा कप ओठांना लावून सुरका मारणारे ‘चहा’त्‍यांना नक्‍कीच आवडते. चहा हा आळस घालवून मूड फ्रेश करतो, आणि तरतरी येते असे चहा पिणाऱ्या शौकिनांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे कंटाळा आला की, निघाले चहा प्यायला. मग काय कटिंग स्पेशल चहा घेता-घेता चर्चा रंगू लागतात. टपरीवरील कटिंगपासून शॉपरूपी झालेल्‍या अमृततुल्‍य कपापर्यंत; त्‍या चहाच्या वेगवेगळ्या चवीची मजाच न्‍यारी.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा