चंद्रपूर, १३ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील भाजप आमदारावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. महिलेने भारतीय जनता पक्षाचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्यावर मारहाण आणि विनयभंगाचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. कीर्तीकुमार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भाजप नेते कीर्तीकुमार यांच्या विरोधात कलम ३५४ सह भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीत, भांगडिया आणि २० जणांनी शनिवारी रात्री उशिरा तिच्या घरी पोचून पतीला मारहाण करण्यास सुरवात केली. फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या पतीला घरातून ओढून नेले आणि नंतर बेदम मारहाण केली.
महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा तिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी आमदार व त्यांच्या समर्थकांनी त्यांचा विनयभंग केला. तसेच, महिलेचे म्हणणे आहे की, तिची दोन मुले आणि तिच्या भावासह कुटुंबातील इतर सदस्यांचीही तोडफोड करण्यात आली. पीडित महिलेच्या पतीचा भाऊ चिमूरमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आहे.
दरम्यान, आमदारानेही पीडितेच्या पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या आईबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश टाकण्यात आल्याचा आरोप आमदाराने केला आहे. ही पोस्ट करण्यात महिलेच्या कुटुंबीयांचा हात आहे. पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार आणि इतर १५-२० जणांविरुद्ध दंगल आणि बेकायदेशीर सभा, विनयभंग यासह आयपीसीच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचवेळी, नोपानी यांनी असेही सांगितले की, आमदाराच्या तक्रारीच्या आधारे महिलेच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि ५०९ अंतर्गत महिलेच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड