वर्धमान महावीर हे इ.स.पू. ६ व्या शतकात होऊन गेलेले महापुरुष आहेत. ते बुद्धाच्या समकालीन पण बुद्धापेक्षा वयाने जेष्ठ होते. त्यांचा जन्म इ.स.पूर्व ५९९ ला वैशाली गणराज्यात कुंडलग्राम येथे राजघराण्यात झाला. ते ३६ वर्षाचे असताना गौतम बुद्धांचा जन्म झाला, तर त्यांच्या निर्वाणसमयी बुद्ध ३६ वर्षांचे होते. त्यांचे निर्वाण इ.स.पूर्व ५२७ ला पावापुरी येथे झाले. त्यांना ७२ वर्षाचं आयुष्य लाभलं. राजा सिद्धार्थ हे त्यांचे पिता तर त्रिशला या त्यांच्या माता होत्या. यशोधा ही त्यांची राणी तर प्रियदर्शनी त्यांची कन्या होती. लोककल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. ते राजपुत्र होते, परंतु राजवैभवाचा आस्वाद त्यांनी नाकारला. स्वतःसाठी जगण्यापेक्षा लोककल्याणासाठी जगायचं हा निर्धार त्यांनी केला.
ऐन तारुण्यात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी लोककल्याणासाठी गृहत्याग केला. त्यांनी १२ वर्षे ज्ञानसाधना केली. त्यांनी वेदप्रामाण्य नाकारून समतेचा पुरस्कार केला. त्यांनी वर्णव्यवस्था नाकारली. त्यांनी ईश्वर, आत्मा, स्वर्ग नाकारून स्यादवाद/अनेकांतवाद मांडला, म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना ईश्वराच्या कृपेने किंवा चमत्काराने नव्हे तर नैसर्गिक कारणाने घडत असतात, हा विचार म्हणजेच बुद्धिप्रामाण्य होय. त्यांनी स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता महिलांना अधिकार दिले. सम्यकदर्शन, सम्यकज्ञान, सम्यकचारित्र्य ही त्रिरत्ने आणि पंचमहाव्रत्ये ही त्यांनी सांगितलेली मूल्यं मानवी विकासासाठी महत्वपूर्ण आहेत.
वर्धमान महावीर हे राजपुत्र असूनदेखील सर्व ऐश्वर्याचा त्याग करून प्रबोधनासाठी गावोगावी गेले. अहिंसा हे त्यांनी जगाला दिलेले महान असं वरदान आहे. आज शस्त्र आणि जैविक युद्धाला रोखायचे असेल तर महावीर व बुद्ध यांच्या अहिंसेची जगाला नितांत गरज आहे. अहिंसा हाच खरा धर्म आहे, असा विचार त्यांनी दिला. कितीही कठीण काळ आला तरी सत्यापासून दूर जावू नका, अशी त्यांची शिकवण आहे. कोणत्याही स्वरूपाची चोरी करू नये, असा नियम त्यांनी केला. गरजेपेक्षा अधिक संग्रह करणं, हा सामाजिक अपराध आहे, ही त्यांची भूमिका होती. आपल्यामध्ये असणारी घमेंड, अहंकार, राग, लालच, द्वेषभावना यावर विजय मिळवणं, हेच खरं शौर्य आहे, असं प्रतिपादन वर्धमान महावीर यांनी केलं.
एखाद्या व्यक्तीला, समुदायाला किंवा देशाला जिंकणं सोपं असतं, परंतु अंधविश्वास, अहंकार, राग, मोह, काम इत्यादी रिपूंना जिंकणं महाकठीण असतं. वर्धमांनानी त्या रिपूवर विजय मिळविला, म्हणून त्यांना महावीर म्हणतात. ते जिंकले म्हणून जैन म्हणतात. वर्धमान महावीर हे २४ वे तीर्थनकर होते. त्यांचं संपूर्ण कार्य आणि जीवन क्रांतिकारक आहे. त्यांच्या विचारानं सर्वसामान्य लोक वैदिक परंपरेविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांचा विचार विषमता नाकारतो. त्यांचा विचार आत्मा, ईश्वर नाकारतो. त्यांचा विचार अंधश्रद्धा नाकारतो. त्यांचा धर्म ईश्वरी नाही तर मानवी कल्याणाचा धर्म आहे.
महावीरांचा धर्म दया सांगतो, त्यांचा धर्म विनयशीलता शिकवितो, त्यांचा धर्म प्रेम शिकवितो, त्यांचा धर्म क्षमाशीलता शिकवितो. क्षमा करायला विशाल अंतकरण लागते. त्यांचा धर्म चिकित्सेला वाव देतो. म्हणून तो प्राचीन काळात राजधर्म आणि लोकधर्म झाला. मानवांचे प्रश्न शस्त्राने नव्हे, तर मानवतावादी शास्त्राने सुटू शकतात, असा विचार महाविरांनी दिला, अशा या महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र वंदन!
-डॉ.श्रीमंत कोकाटे.